घरदेश-विदेशमाझ्यासमोर माझेच आव्हान होते!

माझ्यासमोर माझेच आव्हान होते!

Subscribe

नरेंद्र मोदींचा पुन्हा एकदा काँग्रेसला टोला

२०१९ ची लोकसभा निवडणूक सामाजिक आंदोलनासारखी होती. यावेळी अनेकांकडून समभाव आणि ममभाव निर्माण करण्यात आला होता. अनेकांनी मोदी निवडणुकीत मतभेद निर्माण करतात, असेही सांगितले होते. पण २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांनी सर्व मतभेद गाडून टाकले आहेत. मोठ्यामोठ्या सामर्थ्यासमोर जनतेने सेवाभाव स्वीकारला असून सत्तेचा हव्यास भारतीय जनता स्वीकारणार नाही हे पुन्हा दाखवून दिले. २०१९ च्या निवडणुकीत माझ्यासमोर इतर कोणाचे आव्हान नव्हते. माझ्यासमोर माझेच आव्हान होते.

जे आव्हान मी पूर्ण केले आहे, असे स्पष्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर मोदी बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रस्ताावला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिले. संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी एनडीएच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला. येत्या ३० मे रोजी मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

- Advertisement -

देशात बहुमत मिळवल्यानंतर संसद भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या सर्व यशस्वी खासदारांना मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील टीका केली. निवडून दिल्यानंतर पहिल्यांदाच मोदींनी खासदारांसमोर पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी त्यांनी नव्या खासदारांना आपल्या शैलीत गुरुमंत्र देताना व्हिआयपी कल्चर टाळण्याचे आवाहन केले. यावेळी एनडीएच्या घटक पक्षांचे सर्व बडे नेते उपस्थित होते. शिवसेनेचे उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. यावेळी मोदींची सार्वमताने एनडीएच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘२०१४ मध्ये याच भाषणात मी म्हणालो होतो की माझे सरकार देशातल्या गरीब, वंचित, पीडितांसाठी काम करेल.

आज मी पुन्हा सांगतो की ५ वर्षे आम्ही प्रत्येक क्षणी ती गोष्ट पाळली. आणि आज मी आनंदाने सांगू शकतो, की २०१९मध्ये हे सरकार देशातल्या गरीबांनी बनवले आहे. आपल्या देशात आजपर्यंत गरीब फॅशनचा भाग बनून राहिला. राजकारणाचा विषय बनून राहिला. ५ वर्षांच्या कार्यकाळात आपण ती पद्धत मोडून पाडण्यात यशस्वी ठरलो आहोत’, असे म्हणत मोदींनी काँग्रेसच्या सत्ताकाळावर हल्ला चढवला. प्रादेशिक पक्षांसोबत काम करण्याची आपली बांधिलकी यावेळी मोदींनी बोलून दाखवली. ‘देशाच्या भविष्यासाठी आघाडीच्या राजकारणाचा स्वीकार करावाच लागणार आहे. एक पक्ष कितीही मोठा झाला तरी देशाच्या हितासाठी आघाडीचे राजकारण महत्त्वाचे ठरणार आहे. अटल बिहारी वाजपेयींनीदेखील हेच केले. ही गोष्ट आम्हाला ३०३ जागा मिळाल्यानंतर मी सांगतोय, याचा अर्थ माझी त्याच्याशी बांधिलकी किती असेल, तुम्ही समजून घ्या’, असं ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

एकीकडे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असताना मोदी सरकारमध्ये प्रादेशिक आणि छोट्या पक्षांचे महत्त्व कमी होईल, अशी अटकळ बांधली जात असताना मोदींनी मात्र प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन जाणार असल्याचे म्हटले आहे. ‘देशाच्या राजकारणाचे दोन ट्रॅक आहेत. एक म्हणजे रिजनल अ‍ॅस्पिरेशन्स आणि दुसरे म्हणजे नॅशनल अ‍ॅम्बिशन. याच्या आधारावरच देशाचा विकास होतो. रिजनल अ‍ॅस्पिरेशनकडे दुर्लक्ष देशासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आमचा प्रादेशिक महत्त्वाकांक्षांकडे सकारात्मक दृष्टीकोण आहे. त्यामुळे नॅशनल अ‍ॅम्बिशन आणि रिजनल अ‍ॅम्बिशन्स मिळून आमचा NARA (नारा) आहे’, असे मोदी म्हणाले. तसेच, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा आमचा नवा नारा असेल’, असे देखील मोदींनी यावेळी भाषणात सांगितले.

व्हीआयपी कल्चरवरून टोचले खासदारांचे कान
यावेळी बोलताना मोदींनी एनडीएच्या सर्वच खासदारांचे चांगलेच कान टोचले आहे. ‘एखाद्या विमानतळावर तुमची कुणी तपासणी केली, तर तुम्हाला वाईट वाटते. आपण खासदार असून आपली तपासणी कशी केली? असे तुम्हाला वाटते. पण तुम्हीसुद्धा देशाचे नागरिक आहात हे विसरू नका. देशात लोकशाही जनता चालवत असते. याच व्हीआयपी कल्चरमुळे मोठे नुकसान झाले असून ते टाळा’, असे मोदी यावेळी म्हणाले. असे म्हणताना मोदींनी काँग्रेसला टोमणा मारल्याचे बोलले जात आहे. याशिवाय ‘आपला विजय हा जनतेमुळे आहे. आपल्याला जनादेश आहे. त्यामुळे आपल्याला जनतेच्या आदेशांचे पालन करावे लागणार आहे. त्यापासून आपण एका क्षणासाठी देखील दूर जाऊ शकत नाहीत’, असे मोदींनी यावेळी उपस्थित खासदारांना बजावले.

महिला मतदारांचे केले अभिनंदन!
दरम्यान, यावेळी मोदींनी देशातल्या महिला मतदारांचे अभिनंदन केले. ‘स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढे मतदान झाले आहे. यावेळी विशेष म्हणजे महिलांनी कमाल केली आहे. आत्तापर्यंत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदार कायम ५ ते ७ टक्के कमी राहिले आहे. पण या निवडणुकीत महिला मतदारांनी बरोबरी साधली आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये त्या पुढे निघून जातील. त्याशिवाय महिला खासदारांच्या संख्येचे २०१४ चे आमचे रेकॉर्ड आम्ही यावेळी मोडले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असे घडत आहे’, असे देखील मोदी म्हणाले.

मंत्रीपदाच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका

२०१९ ची लोकसभा निवडणूक सामाजिक आंदोलनासारखी होती. यावेळी अनेकांकडून समभाव आणि ममभाव निर्माण करण्यात आला होता. अनेकांनी मोदी निवडणुकीत मतभेद निर्माण करतात, असेही सांगितले होते. पण २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांनी सर्व मतभेद गाडून टाकले आहेत. मोठ्यामोठ्या सामर्थ्यासमोर जनतेने सेवाभाव स्वीकारला असून सत्तेचा हव्यास भारतीय जनता स्वीकारणार नाही हे पुन्हा दाखवून दिले. २०१९ च्या निवडणुकीत माझ्यासमोर इतर कोणाचे आव्हान नव्हते. माझ्यासमोर माझेच आव्हान होते. जे आव्हान मी पूर्ण केले आहे, असे स्पष्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर मोदी बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रस्ताावला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिले. संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी एनडीएच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला. येत्या ३० मे रोजी मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

‘सध्या माध्यमांमध्ये मोठी चर्चा आहे ती मंत्रिमंडळातल्या संभावित मंत्र्यांच्या नावांची. काही लोक थेट पीएमओच्या नावाने खोटे फोन करून दिल्लीला बोलवत आहेत. या सगळ्या माध्यमांमधल्या चर्चांमधले आकडे एकत्र केले, तर फक्त ५० खासदार शिल्लक राहतील, बाकीचे सगळे मंत्री असतील. त्यामुळे, माझी विनंती आहे की तुम्ही या सगळ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. जर कुणी म्हणत असेल की तो माझा खास आहे, त्याची वर्णी मंत्रिमंडळात लागेल, तर कृपया कुणी त्या भानगडीत पडू नये. असे काहीही होणार नाही. सरकार आम्हीच बनवणार आहोत, इतर कुणी नाही’, असे सांगत मोदींनी मंत्रीपदासाठी लॉबिंग करणार्‍यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

मोदी त्सुनामीने विरोधकांना उद्ध्वस्त केले
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने पुन्हा एकदा केंद्रात सत्ता काबीज केल्यानंतर शनिवारी दिल्लीत ‘एनडीए’च्या संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. मोदी त्सुनामीने विरोधकांना उद्ध्वस्त केले, असे अमित शाह यांनी सांगितले. लोकसभा मतदारसंघनिहाय अधिकृत निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यानंतर शनिवारी भाजपा आणि घटक पक्षांचे खासदार दिल्लीत पोहोचले. ‘एनडीए’च्या संसदीय दलाची दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएतील घटकपक्षांचेही खासदार उपस्थित होते. ‘एनडीए’च्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड करण्याच्या निर्णय घेण्यात आला. संसदीय नेतेपदी निवड होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे आशीर्वाद घेतले.

अल्पसंख्याकांबाबत मोदी झाले मवाळ
देशात आजवर अल्पसंख्याकांचा फार छळ झाला. त्यांना भीती दाखवली गेली. त्यांचा नेहमीच ‘व्होटबँक’ म्हणून वापर झाला. आपल्याला त्याचा विश्वास संपादन करावा लागेल. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल, असे आवाहन करत ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’, हाच आपला मंत्र असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एनडीएच्या बैठकीत बोलताना सांगितले. देशातील अल्पसंख्याक समाज कशाप्रकारे व्होटबँकेच्या राजकारणात भरडला गेला आहे, त्यावर बोट ठेवत मोदींनी अल्पसंख्याकांना आपलेसे करण्याची भूमिका मांडली.

आईच्या आशिर्वादासाठी मोदी गुजरातला
नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीला दुसर्‍यांदा निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आईचा आशीर्वाद घेण्यासाठी रविवारी गुजरातला जाणार आहेत. तर सोमवारी ते वाराणसी या आपल्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. खुद्द नरेंद्र मोदी यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. ‘आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. त्यानंतर सोमवारी मी वाराणसीत असेन. काशी ही महान भूमी आहे. येथील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी जाणार आहे.’ विधानसभा निवडणुकीत दमछाक झालेल्या भाजपने गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ जागा जिंकल्या आहेत. गुजराती मतदारांनी पंतप्रधानपदासाठी मोदींना पूर्ण पाठिंबा दिल्याचे यातून दिसले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -