Eco friendly bappa Competition
घर मुंबई Nalesafai : नागरिकांनी नोंदवल्या १०२ तक्रारी, ८९ तक्रारी सोडवल्या; मुंबई आयुक्तांची माहिती

Nalesafai : नागरिकांनी नोंदवल्या १०२ तक्रारी, ८९ तक्रारी सोडवल्या; मुंबई आयुक्तांची माहिती

Subscribe

मुंबई: नालेसफाईच्या कामांबाबत तक्रार करण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईकरांसाठी १ जूनपासून ९३२४५००६०० हा व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध केला आहे. गेल्या ५ जूनपर्यंत त्यावर १०२ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. मुंबईकरांना १५ जूनपर्यंत सदर क्रमांकावर आपल्या तक्रारी करता येणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी बुधवारी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, १९ – २० मे रोजी मुंबईतील शहर व पश्चिम उपनगरे भागात पाहणी दौरा करून नालेसफाई कामांची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांनी मिलन सब वे येथील नाल्यात कचरा व गाळ आढळून आल्याने संबंधित पालिका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. नालेसफाईची कामे चांगली केली व मुंबईत पाणी न साचता पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा सत्कार केला जाईल. मात्र जर कामचुकारपणा केला व मुंबईतील सखल भागात पाणी साचून नागरिकांचे हाल झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्या हातात नारळ देऊन त्यांना घरी पाठविण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावेळी दिला होता.

- Advertisement -

त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे काही लोकांनी नालेसफाई कामांबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी, नालेसफाई कामांबाबत नागरिकांना तक्रारी करण्यासाठी यंत्रणा उभारून संपर्क क्रमांक उपलब्ध करण्याचे आदेश पालिका आयुक्त चहल यांना दिले होते. मुंबईतील नालेसफाई कामे व नाल्यांतून गाळ काढण्याच्याबाबत तक्रार करण्यासाठीची प्रक्रिया नागरिकांसाठी सुलभ व्हावी, तसेच या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईकरांसाठी वापरकर्त्यांसाठी अनुकुल अशी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार पालिका यंत्रणेने दहा दिवसांनंतर, म्हणजे ३१ मे रोजी हातघाई करून नालेसफाई कामांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी ९३२४५००६०० हा व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध केला.

१ जूनपासून तक्रारी नोंदवण्यास सुरुवात

त्यावर १ जूनपासून नागरिकांनी नालेसफाई कामांबाबत तक्रार करण्यास सुरुवात केली. पालिकेकडे आतापर्यंत १०२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचा आयुक्त व वरिष्ठ पातळीवर अधिकारी आढावा घेत आहेत व त्या तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांतील पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या सहायक अभियंता आणि २४ विभाग कार्यालयात तक्रारी पाहण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

तक्रार, अभिप्राय असा नोंदवा

- Advertisement -

मुंबईतील नागरिकांना ९३२४५००६०० या क्रमांकावर नाल्यातून गाळ काढण्याच्या तक्रारीसाठी तक्रारीचे नेमके ठिकाण, विभाग, दिनांक आणि वेळ आदी माहिती द्यावी लागणार आहे. जीपीएस लोकेशनसह फोटो टाकल्यास तक्रारीचे ठिकाण शोधण्यास अधिक उपयुक्त ठरेल. चॅटबॉट सिस्टिम अंतर्गत ही हेल्पलाईन असणार आहे. मात्र नागरिकांना तक्रारीसाठीचा पूर्ण तपशील सादर करावा लागणार आहे.
पालिकक यंत्रणेकडे नालेसफाई कामांबाबत नागरिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारास एक तक्रार क्रमांक मिळेल. तक्रार निवारण केल्यावर त्याचा फोटो तक्रारदारास अवगत केला जाईल. सदर व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक हा केवळ माहिती पाठविण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या क्रमांकावर कोणत्याही पद्धतीचे संभाषण करण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध नसेल.

- Advertisment -