घरठाणेजितेंद्र आव्हाडांसोबत मैत्री कायम ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी राडा संपवला

जितेंद्र आव्हाडांसोबत मैत्री कायम ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी राडा संपवला

Subscribe

गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड आणि आपली मैत्री आहे. त्यामुळे पक्षाच्या ठिकाणी आम्ही आमच्या भूमिका बदललेल्या असल्या तरी आमची मैत्री कायम असल्याचे सांगताना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडी म्हणूनच महापालिका निवडणुकीत काम करुया, असे सांगत ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे संकेत दिले. तसेच या उड्डाणपुलाच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधातील बॅनर लागले जी काही घोषणाबाजी झाली. मात्र हे आता करू नका, असा सल्लाही कार्यकर्त्यांना देण्यास शिंदे यांनी आवर्जून दिला.

याच दरम्यान, कळवा खारेगाव या रेल्वे उड्डाणपुलाचे नामकरण स्वर्गीय आनंद दिघे उड्डाणपूल असे करीत या पुलाची फित नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड या दोघांनीही एकत्रित कापली. याप्रसंगी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांना राजकीय कोपरखळ्या देत टोलेबाजी करीत या सोहळ्यात रंगत आणली.

- Advertisement -

शिवसेनेचे मिशन कळवा म्हणजे महाविकास आघाडीचे नगरसेवक अधिक संख्येने कसे वाढतील असा त्याचा अर्थ होतो. मात्र, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देखील मिशन वागळे राबवा आम्ही तुम्हाला अडविणार नाही, असा टोला पालकमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादीला लगावला. पण इथे मिशन सोडून कमिशनला हात घालणे अयोग्य आहे, कोणावरही वैयक्तिक टीका करू नये आणि करत असला तर ती अयोग्य आहे. मी कधीही पालिकेत माझी फाईल आहे, मंजूर करा, असे सांगितले नाही. त्यामुळे टीका करताना सांभाळून टीका करण्याचा सल्ला एकनाथ शिंदे यांनी टिकाकारांना दिला.

शिंदे आणि माझ्यात एका अबोल मैत्रीचे ऋणानुबंध – आव्हाड
एकनाथ शिंदे आणि माझी मैत्री ही फार वेगळी आहे, त्यांच्याकडे केव्हाही निधी मागितला तर त्यांनी तो दिला नाही, असेच कधीच घडले नाही. शिंदे यांनी निधी देण्यात कुठेही आखडता हात घेतलेला नाही, परंतु त्यातून काय काय कामे झाली यावर लक्ष मात्र नक्कीच द्यावे लागते, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. शिंदे आणि माझ्यात एका अबोल मैत्रीचे ऋणानुबंध आहेत, तो धागा तुटणार नाही, याची काळजी श्रीकांत शिंदे यांनी घ्यावी आणि हा धागा आणखी मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. आता आपला प्रमुख शत्रू कोण आहे, हे ओळखून आपण एकत्र येणे किती गरजेचे असून महाविकास आघाडी व्हावी ही पूर्वीही इच्छा होती आणि आता देखील आघाडीत आपण आहोत, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

* महापौरांनी नारदमुनी होऊ नका
यावेळी आव्हाड यांनी टीका करणार्‍या आणि कोपरखळ्या लगावणार्‍या महापौर नरेश म्हस्के यांचा देखील चांगलाच समाचार घेतला. तुम्ही राजकारणातील चाणक्य आहात. त्यामुळे चाणक्यच रहा उगाच नारदमुनी होऊ नका, असा सल्ला आव्हाड यांनी महापौरांना दिला.

* पित्याने टोचले पुत्राचे कान
आपल्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावत असेल तर त्याची काळजी घ्या, असा वडीलधारकीचा सल्ला एकनाथ शिंदे यांनी पुत्र श्रीकांत यांना दिला.

* लोकार्पणापूर्वीच कार्यकर्ते भिडण्याच्या तयारीत
उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली. कार्यक्रमापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही आपली ताकद दाखविण्याची तयारी केली. एका बाजूला राष्ट्रवादी तर दुसर्‍या बाजूला शिवसेना पक्षाचे झेंडे लावण्यात आले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आव्हाडसाहेब आगे बढो अशा तर शिवसैनिक कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत होते. यावरून दोन्ही कार्यकर्ते जणू भिडण्याच्या तयारी होते. यावेळी बॅनरबाजीही पाहण्यास मिळाली. मात्र, यावेळी सर्व कार्यकर्त्यांंना सबुरीचा सल्ला पालकमंत्री शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -