घरमुंबईनाव फक्त कल्याण, उमेदवार ठाण्याचेच !

नाव फक्त कल्याण, उमेदवार ठाण्याचेच !

Subscribe

रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटलांनंतर स्थानिक उमेदवारच नाही

कल्याण लोकसभा हा मतदारसंघ हा स्वतंत्र झाला असला तरीसुध्दा या मतदारसंघात आतापर्यंत ठाण्यातूनच उमेदवार लादले गेले आहेत. ठाणे मतदारसंघातून रामभाऊ कापसे आणि जगन्नाथ पाटील यांनी नेतृत्व केले आहे. शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपकडून खेचून घेतल्यांनतर स्थानिकांना डावलून ठाण्यातूनच उमेदवार लादले गेले. 2019 च्या निवडणुकीतही हाच कित्ता गिरवला जात आहे. त्यामुळे नाव फक्त कल्याण मात्र उमेदवार ठाण्याचेच लादले जात असल्याने हक्काच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात स्थानिकांना उमेदवारी कधी मिळणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग हा 2009 च्या मतदार पुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघातून वगळण्यात आला आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ या नावाने नवा मतदारसंघ बनला. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ ओळखला जात होता. या मतदारसंघातून खासदार दिवंगत प्रकाश परांजपे हे चारवेळा निवडून आले.
राजकीय वर्तुळात फारसे परिचित नसतानाही केवळ प्रकाश परांजपेंचे पुत्र म्हणून शिवसेनेने आनंद परांजपेंना खासदारकीचे तिकीट दिले. आधी ठाण्यातून आणि नंतर कल्याणमधून ते खासदार म्हणून निवडून आले. 2014 च्या निवडणुकीत परांजपे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. त्याचवेळी परांजपे यांनी शिवसेना सोडल्याने शिवसेनेसमोर आव्हान होते. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व नुकतेच डॉक्टर झालेले श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेने तिकीट देऊन सेनेचे वर्चस्व कायम ठेवले. 2014 च्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनाही वडील एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेने तिकीट दिले व ते खासदार झाले. त्यामुळे शिवसेनेतील घराणेशाहीचा कारभार चव्हाट्यावर आला होता. आनंद परांजपे आणि श्रीकांत शिंदे हे दोन्ही उमेदवार ठाण्याचेच होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेले वसंत डावखरे हे सुध्दा ठाण्याचेच. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाण्याचेच उमेदवार लादले गेले.

- Advertisement -

कल्याणचे रामभाऊ कापसे आणि डोंबिवलीचे जगन्नाथ पाटील यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. कल्याण लोकसभा स्वतंत्र झाल्यानंतर इथल्या उमेदवारांनी कधीच संधी मिळाली नाही. ठाण्यातूनच उमेदवार देण्यात आले. 2019 च्या निवडणुकीतही वेगळे काही चित्र नाही. शिवसेनेतून विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे लढणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाण्यातील नगरसेवक बाबाजी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. हे दोघेही ठाण्यातीलच आहेत. त्यामुळे कल्याण मतदारसंघात ठाण्यातील उमेदवार लादण्याचा कित्ता यंदाही दिसून येणार हेच चित्र सध्यातरी दिसत आहे.

काय म्हणतो इतिहास ?

कल्याण लोकसभा क्षेत्र हा पूर्वी ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग होता. 1977 पासूनच या मतदारसंघावर शिवसेना भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आधी जनसंघ त्यानंतर भाजपने 1977 आणि 1980 ला रामभाऊ म्हाळगी, 1981 च्या पोटनिवडणुकीत जगन्नाथ पाटील आणि 1989 आणि 1991 ला राम कापसे यांनी भाजपचा झेंडा फडकावला आहे. 1984 ला काँग्रेसचे शांताराम घोलप यांचा अपवाद वगळता या भागातील मतदारांनी हिंदुत्ववादी पक्षांवर विश्वास टाकला. त्यानंतर मात्र हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणला आणि 1996, 1998, 1999, 2004 असा सलग चार वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे विजयी झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -