घरनवरात्रौत्सव 2022प्रतिकूल परिस्थितीत संस्कृतमध्ये पीएचडी मिळवणारी "नवदुर्गा"

प्रतिकूल परिस्थितीत संस्कृतमध्ये पीएचडी मिळवणारी “नवदुर्गा”

Subscribe

सुजाता मोरे यांचा ‘उपनिषदातील प्राण’ संकल्पनेवर शोधप्रबंध

मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ठाण्याच्या सुजाता मोरे यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असतानाही महापालिकेच्या मराठी शाळेत शिक्षण घेऊन संस्कृत विषयात मुंबई विद्यापीठाची पीएचडी त्यांनी मिळवली आहे. ‘कन्सेप्ट ऑफ प्राण इन उपनिषदा’ म्हणजेच उपनिषदांमधील ‘प्राण ’ या संकल्पनेवर त्यांनी शोधप्रंबध लिहिला आहे. नऊ वर्षात अनेक प्रसंग, अडचणी, निराशा त्यांच्या वाट्याला आल्या, पण या सगळ्यांचा सामना करीत त्यांनी हा शोधप्रबंध सादर करत पीएचडी मिळवली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत संस्कृतमध्ये पीएचडी मिळवणारी २१ व्या शतकातील ही नवदुर्गा ठरली आहे.

ठाण्याच्या शिवाईनगर परिसरात सुजाता मोरे या पती बिपीन आणि दहा वर्षांच्या मुलासह राहतात. बिपीन हे कोर्टात नोकरीला आहेत. ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर शाळेत त्यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर दहावी पर्यंतचे शिक्षण तिराडी विद्यालयात झाले. दहावीला त्यांना ८८ टक्के गुण मिळाले होते. ती चार भावंड होती. कौटुंबिक परिस्थती हलाखीची होती. त्यामुळे पुढे शिक्षण घेण्यास तशी घरातून मदत नव्हतीच. मात्र मुलुंड कॉलेजमधून त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली.

- Advertisement -

विवाहानंतरही शिक्षणाची जिद्द त्यांच्या मनात होती. पतीचाही त्यांना पूर्णपणे पाठिंबा होता. संस्कृत हा त्यांचा आवडता विषय होता. त्यातून एम.ए. करण्याचे त्यांनी ठरवले. पण वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्याने, त्यासाठी एक प्रवेश परीक्षा द्यावी लागली. २००४ साली संस्कृत विषयातून एम.ए. झाल्या. पुढे यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून एम. फिल करण्यासाठी सोमय्या कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला. मात्र त्याचवेळी त्या गरोदर होत्या. त्यामुळे एम.फिल करता आले नाही. त्यामुळे पीएचडी करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांच्या मार्गदर्शक डॉ. ललिता नामजोशी यांच्याकडून पीएचडीसाठी प्रेरणा मिळाल्याचे त्या सांगतात. २००९ मध्ये संस्कृतमधून शोधनिंबध सादर करण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठात अर्ज केला.

त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर तब्बल नऊ वर्षानंतर हा शोधनिंबध मुंबई विद्यापीठाने स्वीकारला. हा शोधनिंबध त्यांनी इंग्रजीत सादर केला आहे. त्यांच्या मार्गदर्शक डॉ. ललिता नामजोशी याच आपल्यामागील प्रेरणा असून त्यांच्याकडून अत्यंत मोलाचे मागर्दशन लाभल्यानेच पीएचडी मिळू शकली, असे डॉ. सुजाता मोरे सांगतात. शोधनिबंधाची परीक्षा घेण्यासाठी नेमण्यात आलेले रेफर बी के दलाईसर हे खास पुण्याहून त्यांना भेटायला आले. त्यांचे हे काम पाहून तेसुध्दा प्रभावित झाले. त्यांनी एक पुस्तकही भेट दिले. ते पुस्तक खूपच मोलाचे असल्याचे सुजाता सांगतात. अत्यंत किचकट आणि करिअरच्या कोणत्याही वाटा दिसत नसतानाही केवळ संस्कृत भाषा टिकावी आणि संस्कृतची आवड हाच त्यांच्या पीएचडी मागील उद्देश असल्याचे त्या सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -