नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद , १३ जानेवारीला भूमिपुत्र परिषद तर २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन

navi mumbai airport

पनवेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी आता पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे. दि. बा. पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून १३ जानेवारीला रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यातील भूमिपुत्रांची ’भूमिपुत्र परिषद’ होणार आहे. तर २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने शनिवारी पनवेल येथे आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती दिली. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यत लढाई सुरूच राहणार असल्याची गर्जना यावेळी करण्यात आली.

सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सरचिटणीस भूषण पाटील, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यासह नवी मुंबई, पनवेल, उरण, मुंबई, ठाणे, कल्याणमधील प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रामशेठ ठाकूर म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याबरोबरच लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे ही सर्व भूमिपुत्रांची आग्रही आणि रास्त मागणी आहे. दिबांच्या जन्मदिनी म्हणजेच १३ जानेवारी रोजी भव्य भूमिपुत्र परिषद कोल्ही कोपरगाव, दत्त मंदिराजवळ (ता. पनवेल) विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आली आहे.

ही परिषद म्हणजे प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांच्या अस्मितेची अस्तित्वाची आणि त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची जाणिव करून देणारी आहे. भूमिपुत्रांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला अल्टिमेटम देण्यात येणार आहे. तर २४ जानेवारीला विमानतळाचे सुरु असलेले सर्व काम बंद पाडण्यात येणार आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले. २३ जानेवारीपर्यंत सिडकोकडे वेळ आहे नाही तर विमानतळ काम बंद आंदोलन अटळ आहे, असा इशारा आमदार महेश बालदी यांनी यावेळी दिला.