जनाब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा मी हनुमान चालीसा पठण करणार म्हणून मला 14 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा, उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्त्व कुठे गेले होते? ते उद्धव ठाकरे देशाच्या पंतप्रधानांवर बोलत आहेत. जनाब उद्धव ठाकरे यांची देशाच्या पंतप्रधानांवर बोलण्याची लायकी नाही, असा घणाघात माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
दादरमधील श्री. हनुमानाचे मंदिर पाडण्याची नोटीस, बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचार आणि तेथील इस्कॉनच्या मंदिर तोडफोडीवरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला होता. याचवरून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होत्या.
हेही वाचा : शिंदेंच्या संभाव्य 12 मंत्र्यांची यादी समोर, बड्या नेत्यांना डच्चू; नव्या चेहऱ्यांना संधी
नवनीत राणा म्हणाल्या, “बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारप्रकरणी महाराष्ट्रात मोर्चे काढत निषेध व्यक्त करण्यात आला. तेव्हा, जनाब उद्धव ठाकरे कुठे होते? तेव्हा हिंदुत्त्व आठवलं नाही का? तुम्ही देशातील पंतप्रधानांना हिंदुत्त्व शिकवण्याची गरज नाही. एका लोकप्रतिनिधीला 14 दिवस तुरुंगात टाकले, तेव्हा हिंदुत्त्व कुठे गेले होते?”
“तुम्ही काळजी करू नका. हिंदूंसाठी आमच्यासारखे हिंदू भक्त मैदानात आहेत. तुम्ही फक्त आराम करा, तुम्हाला आराम करण्यासाठीच आम्ही सोडले आहे,” असा टोला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
‘मातोश्री’ येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं, “मुंबईमधील दादरमध्ये रेल्वे स्टेशनजवळ गेल्या 80 वर्षांपासून असलेल्या श्री.हनुमानाचं मंदिर पाडण्याची नोटीस भाजपने पाठवली आहे. विशेष बाब म्हणजे ते मंदिर एका हमालाने मेहनत करुन बांधलं आहे. ती पाठवलेली नोटीस माझ्याकडे आहे. त्या नोटीसीमध्ये लिहिलंय की, तुम्ही रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलंय, 80 वर्षापूर्वीचं मंदिर भाजप पाडायला निघाले आहे. मग भाजपचं हिंदुत्त्व कुठे आहे?”
“बांगलादेशात इस्कॉनचं मंदिर जाळलं, तरी आपण गप्प आहोत. त्या मंदिरातील पुजारी त्यांना अटक झाली, तरीही आपण गप्प आहोत. हिंदूंवर रोज अत्याचार होताय, तरीसुद्धा आपण गप्प आहोत. मग आपले विश्वगुरु हे अत्याचार फक्त पाहत का बसले आहेत?” असा सवाल ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.
”जसं आपण एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं. तसंच बांगलादेशमधील हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत, त्याबद्दल आपण काहीतरी पावले उचलली पाहिजे. इथे फक्त बटेंगे, कटेंगे करुन उपयोग नाहीय. जिथे काही नाहीय, तिथे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीय,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा : पहिलंच भाषण अन् सत्ताधारी पाहतच राहिले, प्रियंका गांधींनी भाजपला सोलून काढलं; एका व्यक्तीचं नाव घेताच…