बालसंस्कारांइतकंच सध्या डिजिटल संस्काराचं महत्व- डॉ. रश्मी करंदीकर

डॉ.रश्मी करंदीकर

लहानपणी आपल्यावर जे बालसंस्कार होतात त्या संस्कारातून एक चांगली व्यक्ती घडते असं म्हटलं जातं. आता या बालसंस्करांबरोबरच मुला- मुलींवर घराघरांतून डिजिटल संस्कार करण्याची वेळ आली आहे. इतका मोठा धोका सध्या ‘सायबर क्राईम’ मुळे संपूर्ण समाजाला निर्माण झाला आहे.

कोकण मर्कंटाईल सहकारी बँक पुरस्कृत ‘आपलं महानगर आणि माय महानगर’ आयोजित कलामंदिर नवदुर्गोत्सवात सहावी दुर्गा म्हणून पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर सहभागी झाल्या होत्या. सध्या सायबर क्राईमने समाजातील सर्वच थरातील व्यक्ती त्रस्त झाल्या आहेत. देशभरातील पोलीस यंत्रणांचा डोकेदुखी ठरलेल्या सायबर क्राईमचा फटका सगळ्यात जास्त जर कोणाला बसत असेल तर तो महिलांना आणि तरुणांना या सायबर क्राईमच्या माध्यमातून महिलांच्या चारित्र्याची खेळणं आणि तरुणांच्या आर्थिक लुबाडणूक इंच माध्यम म्हणून सायबर क्राईमकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.

मुंबई पोलिसांमध्ये डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या डॉक्टर रश्मी करंदीकर यांच्याकडे सध्या या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. ठाणे ग्रामीण मधील गुन्हेगारीला आळा घालणार्‍या आणि लोकसहभागातून जाण्याच्या वाहतुकीला शिस्त लावणार्‍या रश्मी करंदीकर यांनी गेल्या काही काळात अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांची उकल करण्यात बाजी मारली आहे. त्या सांगतात, एखाद्या महिलेच्या बाबतीत फेसबुक किंवा इन्स्टाग्राम वापरताना जर सायबर क्राईम घडलं तर ती फक्त व्यक्तीच नव्हे तिचं संपूर्ण कुटुंब यामुळे तणावाखाली येतं. म्हणूनच आता सगळ्या कुटुंबामधून जसे बालसंस्कार केले जातात तसे आता डिजिटल संस्कार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. कारण महिलांच्या फोटो मॉर्फिंगसारख्या गोष्टीमुळे अनेकजणी नैराश्याच्या गर्तेत लोटल्या जाण्याची भीती आहे.

मुंबईसारख्या शहरात जगताना महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एक महिला असल्यामुळे मला त्याची उत्तम जाण आहे; पण ज्या महिला सायबर क्राईमच्या माध्यमातून अडचणीत येतील त्यांना माझे इतकेच सांगणे आहे की त्यांनी कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता मुंबई पोलिसांशी संपर्क साधायला हवा. मग तो ट्विटरच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या पोलीसांच्या माध्यमातून आणि मला सांगायला अभिमान वाटतोय जगातल्या सर्वोत्तम हँडलपैकी मुंबई पोलिसांचं ट्विटर हँडल आहे त्यावर माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात आम्ही त्या अडचणीत असलेल्या महिलेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो, असं सांगून डॉक्टर करंदीकर सांगतात, लॅपटॉप, मोबाईल इतर डिजिटल गॅझेट आपल्या जीवनाचा एक भाग झाला असल्यामुळे यातली गुन्हेगारी ही त्याच प्रमाणात वाढणार आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. अन्यथा कौटुंबिक समस्या आर्थिक लूट या गोष्टी खूपच तापदायक ठरू शकतात.

एका मध्यमवर्गीय कुटुंबातून लहानाची मोठी झाल्यावर डॉक्टर रश्मी करंदीकर यांनी आयएएस व्हावं असं त्यांच्या आजीला वाटत होतं. मात्र, एक पोलीस अधिकारी म्हणून काम करायला मिळाल्याचा आपल्याला खचितच आनंद आहे कारण माझ्या कुटुंबात शिक्षकी पेशाची परंपरा असताना पोलीस सेवेत भरती झाली यामुळे माझी आई तितकीशी समाधानी नव्हती; पण आज ज्या स्तरावर मी काम करते आणि अनेक गरजू महिलांसाठी ज्या वेळेला मला थोड्याफार प्रमाणात सहकार्य करता येते या भावनेमुळे मी आयुष्यात समाधानी आहे याचे श्रेय माझ्या सर्व वरिष्ठांचं आणि सहकार्‍यांचं आहे. तसेच ते माझ्या कुटुंबियांचंही आहे, असं अत्यंत कृतज्ञतेने डॉक्टर करंदीकर कबूल करतात.

ही मुलाखत सविस्तरपणे पाहण्यासाठी आपण www.mymahanagar.com ला भेट देऊ शकतात.