समाजातील दानशूर व्यक्तींना राजकीय रंग लावू नये- नीता लाड

समाजात खूप लोकांना गरिबांसाठी काम करायचंय. गरजूंसाठी पदरमोड करायची आहे; पण सहकार्यासाठी पुढे येणार्‍या हातांवर राजकीय पक्षांची लेबलं लावली तर मात्र अडचण होते आणि ते हात मागच्या मागे जातात. त्यामुळे समाजासाठी काहीतरी देऊ पाहणार्‍या मंडळींकडे सगळ्याच राजकीय पक्षांनी सकारात्मक पद्धतीने बघण्याची गरज आहे, असं मला अंत्योदयच्या माध्यमातून सामाजिक काम करताना जाणवलं, असं मत सुप्रसिद्ध उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या नीता प्रसाद लाड यांनी बोलून दाखवलं.

कोकण मर्कंटाइल सहकारी बँक प्रस्तुत ‘आपलं महानगर आणि माय महानगर’ आयोजित कलामंदिर नवदुर्ग सभांमध्ये सहभागी झालेल्या पाचव्या दुर्गा होत्या नीता प्रसाद लाड. जगभरात कोविडमुळे जी दाणादाण उडाली त्यापेक्षा राज्यातील सगळ्यात छोटा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग आणि फलोत्पादन जिल्हा असलेल्या रत्नागिरीमध्ये कोविडच्या साथीत कोकणी माणसांची खूपच होरपळ झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अंत्योदयच्या माध्यमातून नीता लाड यांनी आरोग्य सेवा विषयक भरीव कार्य केले. त्याच प्रमाणे त्यांनी आपल्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गोव्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबवले. काँग्रेसचे माजी आमदार बाबुराव भापसे यांची कन्या असलेल्या आणि भाजप नेते प्रसाद लाड यांची पत्नी असलेल्या नीता लाड या क्रिस्टल उद्योग समूहाच्या सर्वेसर्वा आहेत.

सामाजिक क्षेत्रात काम करताना ही ज्येष्ठ नागरिक रुग्ण आणि त्यातही १८ वर्षांखालील मुलांसाठी काम करण्याचा संकल्प सोडलेल्या नीता लाड या सरकारचे लक्ष एका सामाजिक समस्येकडे वेधताना सांगतात. अनेक अनाथ मुलांना १८ वर्षांपर्यंत सांभाळणार्‍या अनेक संस्था आहेत; पण ती मुलं १८ वर्षांवरील झाली की त्यांना त्या संस्थेतून बाहेर जावं लागतं. कारण ती सज्ञान झाल्याचं कारण देत संस्था त्यांना आपल्यापासून दूर लोटते. मग अचानक छत्र हरपलेल्या या मुलांची सामाजिक समस्या हा एक गंभीर विषय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार आणि वेगवेगळ्या पातळीवर काम करणार्‍या शासकीय आणि निमशासकीय दानशूर मंडळींनी या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण अचानक स्वतःची जबाबदारी पडल्यामुळे या मुलांना कसं जगायचं आणि कसं वागायचं हेच कळत नाही. साहजिकच ही मुलं वाममार्गाला लागू शकतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या समस्येवर व्यापक काम करायची गरज आहे.

परळ लालबागमध्ये बालपण गेलेल्या आणि काँग्रेसी संस्कारात वाढलेल्या नीता लाड सांगतात, माझे बाबा दोन वेळा आमदार होते. तेव्हा घरी खूप लोकांचा राबता असायचा. त्यामुळे माणसांचा कधी कंटाळा येत नाही. जी गोष्ट माहेरची तीच सासरची. प्रसादलाही माणसांमध्ये रहायला आवडतं. पण गेल्या काही वर्षांत राजकारणाचा पोत बदललाय. ते खूपच कमर्शियल झालंय. त्यामुळे कधीकधी उबग येतो; पण शेवटी आपण ते सोडून कामच करू शकत नाही. कारण आपल्याकडे कोणत्याही गोष्टीला पूर्णत्व देण्यासाठी राजकीय वरदहस्त लागतोच. त्यामुळे सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसणार्‍या व्यक्तीकडे संवेदनशीलता असणं गरजेचं आहे, असंही नीता लाड नमूद करतात.

ही मुलाखत सविस्तरपणे पाहण्यासाठी www.mymahanagar.com ला भेट द्या.