बाबांचा संयम, आजी-आईचे संस्कार हाच माझा मंत्र – आदिती तटकरे

बाबांनी मला संयम आणि शिस्तीचे धडे दिले तर आजीने आणि आईने मला संस्कार आणि कौटुंबिक मूल्यं शिकवली. त्यामुळेच डोकं खांद्यावर ठेवून थोडेफार काम करणे शक्य होत आहे. पण या सगळ्यातही मला शरद पवार नावाच्या राजकीय विद्यापीठातल्या नर्सरीत प्रवेश मिळाला हे मी माझे अहोभाग्य समजते, अशी कृतज्ञता उद्योग, पर्यावरण राज्यमंत्री आदिती सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे

कोकण मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक प्रस्तुत ‘आपलं महानगर आणि माय महानगर’ आयोजित कलामंदिर नवदुर्गोत्सवात तिसरी दुर्गा म्हणून आदिती तटकरे सहभागी झाल्या होत्या. कोकणातील ‘निसर्ग’ आणि ‘तौक्ते’ चक्रीवादळ त्यानंतर चिपळूणमध्ये आलेला पूर आणि महाडमध्ये दरडीखाली दबून गेलेले तळये गाव या दुर्घटनांमध्ये आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून केलेले काम आणि लोकप्रतिनिधी म्हणून उमटवलेला कामाचा ठसा याचे फक्त राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकीय वर्तुळातही कौतुक करण्यात आले. महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदाच निवडून येणार्‍या आदिती तटकरे या राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या असल्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय

यंग ब्रिगेडच्या त्या एक महत्त्वाच्या सदस्या झाल्यात. यासाठी त्यांना आजोबा आणि वडिलांच्या राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी आपल्या छोट्याशा राजकीय प्रवासाबद्दल त्या सांगतात, बारावीपर्यंतचे शिक्षण कोकणात झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी मी मुंबईत आले. पण मुंबईत शिकताना किंवा प्राध्यापिकेचे करिअर निवडताना एका गोष्टीचा विसर मला पडला नाही तो म्हणजे माझे बाबा खासदार सुनील तटकरे यांच्याकडून घेतलेली शिस्त आणि संयमीवृत्ती. पण त्याच वेळेला मला सगळ्यात महत्त्वाचे जर काय वाटते तर ते म्हणजे आजी आणि आईने केलेले कौटुंबिक संस्कार. त्यामुळे आपल्या घरी येणार्‍या किंवा आपल्याकडे काम घेऊन येणार्‍या, समस्या मांडणार्‍या प्रत्येक व्यक्तीमध्ये मी आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणूनच बघण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळेच माझे अर्ध काम सोपे झालेले असते.

एकूण आठ मंत्रालयाचा कार्यभार असलेल्या आदिती या जरी राजकीय पार्श्वभूमीतून येत असल्या तरी कसोटीच्या वेळी त्यांनी दाखवलेले धाडस, केलेले काम आणि कष्टाळू वृत्ती या सगळ्यांचीच गेले अनेक महिने चर्चा होतेय.

कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला आणि चिपळूण महाड या परिसरामध्ये अनेकांनी आपले सर्वस्व गमावले तर महाडच्या तळये गावाला दरड कोसळल्या नंतर जमिनीखाली अक्षरशः समाधीस्त व्हावे लागले. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या अनेक गुणांची कसोटी लागली असे सांगत आदिती म्हणतात, या नैसर्गिक आपत्ती काळात काम कसे करायचे हे मोठ्या साहेबांकडून म्हणजेच शरद पवारांकडून शिकता आले. या समस्येची तीव्रता किती आहे हे देखील त्यांनी त्यांच्या अनुभवावरून आणि त्यांनी केलेल्या अभ्यासावरून समजावून सांगितले. त्यावेळेला आपद्ग्रस्तांसाठी मदतीचे काम करणे, सरकारी अधिकार्‍यांबरोबर समन्वय साधणे या गोष्टी खूपच सोप्या होऊन गेल्या. आणि तेव्हा असे लक्षात आले अख्खा देश ज्यांना राजकारणाचे विद्यापीठ म्हणतो त्या शरद पवार विद्यापीठामध्ये नर्सरीसाठी का होईना, पण मला प्रवेश मिळाला हे मी माझे अहोभाग्य समजते.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला जे काम करता आले त्या कामामुळे राजकारणात नवीन असूनही आत्मविश्वासाने वावरता येऊ लागले. विधानसभेची सदस्य झाल्यानंतर पहिल्याच कार्यकाळात आठ मंत्रालयांच्या कार्यभाराची राज्यमंत्री म्हणून मिळाली असं सांगून त्या पुढे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाकलेल्या विश्वासामुळे प्रत्येक पावलावर सतत सावध राहून आणि जागरूक राहून काम करावे लागते. बहुदा त्यामुळेच काम करताना एक वेगळी ऊर्जा घेऊन राजकीय क्षेत्रात वावरता येते. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिकाधिक प्रामाणिक काम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असे विनम्रपणे आश्वस्त करतात.

ही मुलाखत सविस्तरपणे पाहण्यासाठी आपण www.my Mahanagar.com वर भेट देऊ शकता.