घरमुंबईमनापासून आणि नेटानं काम केलं की सगळ्यांचा विश्वास मिळतोच- मनीषा पाटणकर- म्हैसकर

मनापासून आणि नेटानं काम केलं की सगळ्यांचा विश्वास मिळतोच- मनीषा पाटणकर- म्हैसकर

Subscribe

मुख्यमंत्रीपदी असलेल्या व्यक्तीला आपल्या राज्याचा प्रामाणिकपणे विकास करायचा असतो. त्यामुळे अशा नेतृत्वाखाली काम करताना मन लावून नेटाने काम केले की कोणतीही व्यवस्था आणि नेतृत्व हे तुमच्यावर विश्वास ठेवतच हा माझा गेल्या २९ वर्षांचा अनुभव आहे, अशी प्रांजळ कबुली आपली यशोगाथा विशद करताना राज्याच्या पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्रालयाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी दिली आहे.

कोकण मर्कंटाइल बँक पुरस्कृत ‘आपलं महानगर आणि माय महानगर’ आयोजित कलामंदिर नवदुर्गोत्सवाच्या मालिकेतली पुढची दुर्गा होताना ज्येष्ठ सनदी अधिकारी असलेल्या मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी आपल्या कौटुंबिक, प्रशासकीय अनेक मुद्यांना स्पर्श केला.

- Advertisement -

मूळच्या नागपूरकर असलेल्या आणि गेली अनेक वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून मुंबईत काम करत असलेल्या मनीषा पाटणकर-म्हैसकर सांगतात, राज्यात १९९५ साली युतीची पहिल्यांदा सत्ता आली. त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मला अमरावती महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर आलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी मला वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर काम करू दिले. या सगळ्या काळात मला एक गोष्ट नीट लक्षात आली ती म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीला आपल्या राज्याचा अत्यंत प्रामाणिकपणे विकास करायचा असतो. आपल्या जनतेसाठी वेगवेगळे प्रकल्प राबवायचे असतात. एकूणच काय तर प्रगतीपथाकडे पाऊल टाकायचे असते.

अशा कोणत्याही नेतृत्वाबरोबर काम करताना आपण आपले काम मन लावून आणि नेटाने केले की कोणतीही व्यवस्था आणि कोणतेही नेतृत्व हे आपल्यावर विश्वास टाकते. त्यामुळे किंतुपरंतु न ठेवता आपण नेटाने काम केले तर त्याचा राज्यासाठी सकारात्मक उपयोग होतो. असे सांगून त्या पुढे म्हणतात, मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी असो किंवा नगरविकास, पर्यावरण यासारख्या संवेदनक्षम मंत्रालयातील सचिव पदाची जबाबदारी जिथे संधी मिळेल तिथे मी प्रामाणिकपणे काम करण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळेच कोविडसारख्या महामारीच्या काळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड बरोबरच्या युद्धात मला लढण्याची संधी दिली.

- Advertisement -

मनीषा पाटणकर-म्हैसकर यांचे वडील अरुण पाटणकर हे राज्य सरकारमधील महत्वाच्या पदावरून निवृत्त झाले. तर त्यांचे पती मिलिंद म्हैसकर हे गृहनिर्माण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. सासरी आणि माहेरी दोन्हीकडे प्रशासकीय घटना आणि घडामोडी जगणार्‍या मनीषा म्हैसकर सांगतात, आयुष्य जगताना आपण नेमस्तपणे जगायला हवं. काल काय झालं आणि उद्या काय होणार यापेक्षा आजचं आयुष्य आपण किती छान जगू शकतो याचा आपण विचार करायला हवा.

गेल्या अनेक वर्षात मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी अनेक जबाबदार्‍या पार पाडताना प्रसारमाध्यमांनी त्यांच्याबरोबर नेहमीच सहकार्याची भावना जोपासली आहे. एरवी दुर्लक्षित असलेल्या पर्यावरण मंत्रालयातील कामाला आणि त्या विभागाला दुर्लक्षित विभाग म्हणून ओळखला जायचा. विकास आघाडी सरकारच्या काळात मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्याकडे पर्यावरण विभाग आल्यानंतर त्याला एक वेगळेच महत्व आल्याचे लक्षात येते. यावर अत्यंत विनम्रपणे आपली बाजू मांडताना त्या सांगतात, जगभरात ग्लोबल वार्मिंगची असलेली समस्या त्याचप्रमाणे पर्यावरण विषयक समस्यांबाबत जनता आणि सरकार यांच्यामध्ये झालेली जागृकता हीच एक या विभागाला महत्व प्राप्त होण्याची गोष्ट आहे.

त्या जोडीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अत्यंत तळमळीने या मंत्रालयातील कामकाज आकडे पाहायला सुरुवात केली आहे. स्वतः मुख्यमंत्री हे देखील पर्यावरण विषयक गोष्टींच्या बाबत सजग असतात. साहजिकच माध्यमांनी देखील गेल्या काही काळात या मंत्रालयाला आपल्या बातम्यांमध्ये महत्वाचे स्थान दिलेले आहे. या सगळ्याच गोष्टी घडत असताना माझं काम हे मात्र निमित्त आहे. पर्यावरण विषयाची मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची जागरूकता हेच याचे प्रमुख कारण असल्याचे त्या नमूद करतात.

ही मुलाखत सविस्तर पाहण्यासाठी www.mahanagar.com ला भेट द्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -