कुणाच्यातरी स्वप्नांसाठी आपण निमित्त होणे हे आनंद देणारे आहे – मुक्ता बर्वे

‘डबलसीट’ हा चित्रपट पाहून आम्ही घर घेण्याच्या प्रयत्नात उडी घेतली असे सांगणारे अनेक प्रेक्षक मला भेटतात आणि ते त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी माझ्या एखाद्या चित्रपटातल्या पात्राचा आधार घेतात. स्वप्नपूर्ती करून घेतात. त्या वेळेला खूप सुखावून जायला होते. कुणाच्यातरी स्वप्नांसाठी आपण निमित्त होतो ही गोष्टच असीम आनंद देणारी आहे असे मला वाटते अशी प्रामाणिक भावना अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केली.

आपलं महानगर आणि माय महानगर आयोजित कोकण बँक पुरस्कृत कलामंदिर दुर्गोत्सवामध्ये नववी दुर्गा म्हणून सहभागी होणार्‍या नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी अनेक मुद्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपट, नाट्य, मालिका, कविता, आपल्या भूमिका, मुंबई-पुणे-मुंबई वाया ठाणे, कोविडमधली चित्रपट सृष्टी अशा अनेक विषयांवर त्यांनी संवाद साधला.

मी अभिनय करणारी कलाकार आहे. स्टार नाही. त्यामुळे मी पाय जमिनीवर ठेवून वागत आणि जगत असते. त्यामुळे माझ्या भूमिका नेहमीच सहजगत्या रसिकांशी कनेक्ट होतात. त्यांना त्या आपल्या जीवनाशी निगडित वाटतात. डबल सीट बघून अनेकांना घर घेण्याचे धाडस करावे असे वाटले हीच गोष्ट मला सुखावून टाकते. असे सांगून अनेक पुरस्कारांचा मान पटकावणार्‍या मुक्ताला ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरंजनाचा आयपीएल आहे का असे विचारल्यावर ती म्हणते, ओटीटी मनोरंजनाचा आयपीएल नाही तर वर्ल्ड कप आहे. कारण सगळे मोठे कलाकार, लोकेशन आणि व्याप पाहता हा एक खूपच मोठा प्लॅटफॉर्म आहे. ते नव्या जमान्याचे माध्यम आहे, जे आपण स्वीकारायलाच हवे.

वयाच्या चौथ्या वर्षांपासून बाल रंगभूमीवर अभिनय करणारी गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक मोठी कारकीर्द असणारी मुक्ता बर्वे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता विनय आपटे यांच्याबद्दल बोलताना खूपच भावूक होते. ती म्हणते, विनय अभिनयाचा खराखुरा पहाड जणू. त्यांच्यासारख्या व्यक्तीने, त्यांच्या सावलीत मला अभिनयाचे धडे दिले. त्याबद्दल माझ्यासारखी एक छोटी कलाकार स्वतः ला नशीबवान समजते. कबड्डी-कबड्डी सारख्या नाटकात माझ्याकडून अभिनय करून घेताना त्यांनी ज्या गोष्टी करून घेतल्या त्या फक्त त्यांच्यासारख्या दिग्दर्शकालाच जमू शकतात, असे मला वाटते. एक कलाकार आणि दिग्दर्शक याच्या पलीकडे जाऊन आमचे नाते हे बापलेकीचे होते, असे म्हटले तर ते वावगं ठरणार नाही. त्यामुळेच ते माझ्याकडून सर्वोत्तम काम करून घेऊ शकले. कबड्डी-कबड्डी या नाटकासाठी नव्हे तर आयुष्यभरासाठी मी विनय आपटे सरांची ऋणी आहे.

कोविडकाळात मुक्ता बर्वे आणि तिच्या आई-वडिलांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आपल्या बरोबर काम करणार्‍या सहकलाकारांचे दुःख समजून घेऊन त्यांना मदत करण्यात मुक्ताने आपल्या काही कलाकार मित्रमंडळींसह महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या मुक्ता ठाण्यात राहते. ठाण्याबद्दल बोलताना या शहराबद्दलची आपली आपुलकी व्यक्त करते आणि सांगते, मी पुणेकर असल्यामुळेच ठाण्यातले राहणीमान, वातावरण मला अधिक आपलेसे वाटते. नाटकांनिमित्त मी ठाण्यात यायची. तेव्हाच मला ठाण्यात रहायला यावेसे वाटत होते. हल्ली काही भागात उंचच उंच टॉवर झाले असले तरी आजही ठाण्यातील काही भागात एका सांस्कृतिक शहराच्या खुणा कायम आहेत. ठाण्यात जो आपलेपणा मिळतो तो वर्णनापलीकडचा आहे. त्यामुळेच आई बाबा आणि मी आम्ही ठाण्याला राहण्यासाठी पसंती दिलेली आहे.