ठाकरेंची सून होण्यापेक्षा राज ठाकरेंच्या मनसेची कार्यकर्ती होणं कठीण- शालिनी ठाकरे

ठाकरे यांची सून होणे जितके कठीण आहे त्याहीपेक्षा आव्हानात्मक राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याची सहकारी होणे आणि त्यांच्या पक्षात काम करणे, हे अधिक आव्हानात्मक आहे, असे मला वाटते. मी स्वतः जन्माने पंजाबी असले तरी कर्माने मराठी आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र हा कॅन्व्हास घेऊन काम करणार्‍या राज ठाकरेंबरोबर काम करणे हे मला केव्हाही अभिमानास्पद वाटते, अशी प्रांजळ भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मांडली.

‘माय महानगर आणि आपलं महानगर’ आयोजित कोकण मर्कंटाइल बँक पुरस्कृत त्याला मंदिर नवदुर्गा उत्सवामध्ये सहभागी होताना मनुष्याने त्या शालिनी ठाकरे यांनी ठाकरे कुटुंब, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे याबरोबरच आपल्या भावी संकल्पनांवर भाष्य केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चुलत बंधू आणि माजी क्रिकेटपटू जितेंद्र ठाकरे यांची अर्धांगिनी असलेल्या शालिनी ठाकरे यांनी मनसेच्या चित्रपट सेनेसारख्या विभागात काम करताना स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. गेली अठरा महिने बंद असलेली नाट्यगृह आणि चित्रपटगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असले तरी या संपूर्ण इंडस्ट्रीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. याबाबत बोलताना शालिनी ठाकरे सांगतात, चित्रपटसृष्टीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत.

या समस्या सोडवताना निर्माते-दिग्दर्शक तंत्रज्ञ यांच्याबरोबर सगळ्यांनाच एका वेगळ्या जाणिवेने काम करावे लागणार आहे. पण हे करत असताना आमच्यासारख्या राजकीय संघटनेच्या पदाधिकार्‍यांना अधिक काळजीने वावरावे लागणार आहे. तसेही शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान या स्टारशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर व्यक्तिगत मैत्री आहे. आमच्या हातून एखादी गोष्ट चुकीची घडल्यास ती पक्षाध्यक्षांपर्यंत पोहोचण्यासाठी दुसर्‍या कोणत्याच मध्यस्थी व्यक्तीची गरज नसते. कारण ही सगळी मंडळी थेट राज ठाकरे यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे काम करताना आपल्याला जबाबदारीचे एक वेगळे भान ठेवून वावरावे लागते. ही गोष्ट अनेक वर्षे आमचे अध्यक्ष अमेय खोपकर, मी आणि माझ्या बरोबर इतर सगळे सहकारी यांनी नीट समजून घेतली असल्यामुळे आमच्या चित्रपट सेनेचे काम हे व्यवस्थित सुरू असते.

एखाद्या प्रश्नावर सुपरस्टार शाहरुख खान याला ‘कृष्णकुंज’वर यावे लागते, ही आमच्या संघटनेची नव्हे तर राज ठाकरे यांचीच ताकद आहे, असे मला वाटते, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या. पंजाबी उद्योगपतीच्या कुटुंबात जन्मलेल्या शालिनी ठाकरे यांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या वैवाहिक आयुष्याच्या यशाबद्दल बोलताना सांगितले की, मी ठाण्याची रहिवासी असले तरी विद्यार्थिनी पोद्दार महाविद्यालयाची. माझी जितेंद्र ठाकरे यांच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर आमचा संसार अगदी सुखाने सुरू आहे. आमची दोन्ही मुले विदेशात शिकतात. खरंतर राजकीय पक्ष यापेक्षा राज ठाकरे यांचे नेतृत्व आणि त्यांची काम करण्याची शैली यामुळे मी मनसेकडे आकर्षित झाले. त्यानंतर काही निवडणुका जरी लढले असले तरी राज ठाकरे यांचा शब्द, आदेश आणि मार्गदर्शन हीच माझी राजकीय आणि सामाजिक पुंजी आहे, असे मी समजते.

शालिनी यांच्या कुटुंबातून जितेंद्र यांच्याबरोबरच्या विवाहाला परवानगी नव्हती. मात्र, 19९२-93 ला संपूर्ण देशभरात उसळलेली दंगल आणि त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका यामुळे अत्यंत कडक शिस्तीच्या आणि उद्योगपती असलेल्या माझ्या वडिलांचा या लग्नाला विरोध मावळला. ठाकरेंची सून होणे जितके आव्हानात्मक आहे, तितकेच राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या संघटनेत सहकारी म्हणून काम करणेही आव्हानात्मक आहे. याचे कारण राज ठाकरे एखाद्या घटनेकडे किंवा आंदोलनाकडे इतर राजकीय नेत्यांपेक्षा वेगळ्या नजरेतून बघत असतात. त्यामुळे ते आंदोलन यशस्वी करणे किंवा ते काम पूर्णत्वाला नेणे ही खरीखुरी परीक्षा बघणार असते, असेही शालिनी ठाकरे नमूद करतात.