आर्यन खानला सतीश मानेशिंदे जामीन मिळवून देऊ शकले नाहीत, किंग खानने वकिलच बदलला

क्रूझ रेव्ह ड्र्ग्ज पार्टीप्रकरणी बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या आर्यन आर्थर रोड तुरुंगात दिवस मोजत आहे. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दोन वेळा आर्यनला जामिन मिळवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही वेळेला कोर्टाने जामिन अर्ज फेटाळला. यामुळे हवालदिल झालेल्या शाहरुखने आता वकीलच बदलण्याचा निर्णय घेतला असून आर्यनची केस आता वकील अमित देसाई लढणार असल्याची चर्चा आहे.

अमित देसाई हे गुन्हे प्रकरण हाताळणारे वकील आहेत. सतीश मानेशिंदे यांच्यासारखेच ते निष्णांत वकील असून दबंग सलमान खानला हिट अँड रन प्रकरणात देसाई यांनीच जामिन मिळवून दिला होता. आर्यनच्या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. देसाई यांनी आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचा मुद्दा लावून धरला होता. तसेच आर्यनला व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार असल्याने त्याला लवकरात लवकर जामिन देण्यात यावा अशी विनंती देसाई यांनी कोर्टाला केली होती. पण कोर्टाने देसाई यांचा जामिन फेटाळून लावला होता. यामुळे बुधवारी कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.