NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर पोलिसांची पाळत, वानखेडेंची DGPकडे तक्रार

ncb zonal director sameer wankhede filed police complaint to dgp

मुंबई नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार महाराष्ट्राच्या डीजीपीकडे केली आहे. समीर वानखेडे यांनी दोन पोलीस कर्मचारी पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. माहितीनुसार, याप्रकरणात ओशिवारा पोलिसांनी स्मशानभूमीत जाऊन समीर वानखेडे यांचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे. २०१५ साली समीर वानखेडे यांच्या आईचे निधन झाले होते आणि तेव्हापासून ते दररोज स्मशानभूमीत जातात.

समीर वानखेडे यांच्यावर दोन पोलीस कर्मचारी पाळत ठेवत असून ते कुठे कुठे जात आहेत, याची नोंद करत आहेत. समीर वानखेडे यांनी सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकडे दाखल केला आहे. त्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी साध्या वेशात त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांनी दाखवले आहे. तसेच त्यांनी स्मशानभूमीतील सीसीटीव्ही फुटेज देऊन समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप लावला आहे.

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनांनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले. तेव्हापासून समीर वानखेडे यांचे नाव चर्चेत आले आहे. अनेक धाडी टाकून ड्रग्ज जप्त केल्यामुळे वानखेडे यांना ‘सिंघम’ म्हटले जाते. तसेच त्यांच्या नावाने बॉलिवूड सेलिब्रिटीज घाबरतात असे देखील म्हटले जाते.

२ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या टीमने धाड टाकली होती. आता याप्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्यासह त्यांची टीम करत आहे. याप्रकरणातील चार्जशीट दाखल करण्यासाठी एनसीबी टीमला ६ महिन्याचा कालावधी दिला आहे. यादरम्यानच समीर वानखेडे यांची मुदतवाढ आणखी ६ महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे.


हेही वाचा – परमबीर सिंहांच्या नावावर सिन्नरमध्ये बेहिशेबी मालमत्ता?