आमदार सरवणकर यांच्यावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Mahesh Tapase

मुंबई : सार्वजनिक कार्यक्रमात स्वतःची बंदूक दुसर्‍याकडे देता येत नाही. दुसऱ्याकडे देऊन त्याने बंदुकीतून गोळीबार केला असेल तर त्यात आमदार सदा सरवणकर हेही दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी केली. तसेच सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार करणारा दुसरा कोण हे पोलीसांनी उघड केले पाहिजे, अशी मागणीही राष्ट्रवादीने केली आहे.

मुंबईतील प्रभादेवीमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत झालेल्या गोळीबारात घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले काडतूस हे एका लोकप्रतिनिधींच्या बंदुकीतून सुटलेले असले तरीही हे काडतूस अन्य व्यक्तीकडून फायर झाल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले आहे. या उत्तरामुळे सदा सरवणकर यांना क्लिनचिट दिल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सरकारवर टीका केली आहे. आमदार सदा सरवणकर हे बंदुकीचे परवानाधारक आणि त्यांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतो म्हणून क्लीनचीट मिळणार असेल तर शिंदे – फडणवीस सरकार कायदा कशापद्धतीने धाब्यावर बसवत आहे हे स्पष्ट होत आहे, अशी टीका त्यांनी केली. स्वतःची अधिकृत आणि परवाना असलेली बंदूक ही दुसर्‍याला वापरण्यासाठी देता येते का? असा सवालही तपासे यांनी केला आहे.

भारतीय शस्त्र कायदा १९५९ कलम ३ मध्ये परवाना नुतनीकरण असेल किंवा बंदूक दुरुस्ती करावयाची असेल तर अशावेळी दुसरा व्यक्ती परवानाधारकाचे पत्र घेऊन त्याच्या उपस्थितीतच ती बंदुक स्वतः कडे ठेवू शकतो, असे स्पष्ट म्हटले आहे, याची आठवण महेश तपासे यांनी करुन दिली आहे.

भाजपाच्या धोरणांनुसारच घडले – भास्कर जाधव
सदा सरवणकर यांना क्लीनचीट मिळाल्याबद्दल भास्कर जाधव यांना विचारले असता त्यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना शिवसेना-भाजपा सरकारवर ताशेरे ओढलेत. यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “सदा सरवणकर यांनी तीन महिन्यांपूर्वी स्वत: रिवॉल्वरमधून गोळी झाडली होती, असा अहवाल आला होता. आता तीन महिन्यांनंतर त्यांना याप्रकरणी क्लीनचीट दिली आहे. यात विशेष असं काहीही नाही. यापूर्वी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्यांची ईडीने आणि सीबीआयने चौकशी केली, ते लोक भाजपात गेल्यानंतर त्यांना क्लीनचीट मिळत गेली. त्यामुळे सदा सरवणकर हे भाजपाच्या सरकारमधले एक घटक पक्ष आहे. त्यामुळे त्यांना क्लीनचिट मिळायलाच पाहिजे होती. हे सर्व भाजपाच्या धोरणांनुसारच घडलं आहे”