भेट देण्याच्या उपक्रमानंतर आता राज्य करायला थोडी उसंत मिळेल, जयंत पाटलांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

jayant patil and shinde

मुंबई – सर्व गणपतींना भेट देण्याचा उपक्रम आता बाप्पाच्या जाण्यानंतर महाराष्ट्रात पूर्ण होणार आहे. आता राज्य करायला थोडी उसंत मिळेल, असा टोला लगावतानाच राज्यात संकटात असलेल्या बळीराजाला मदत करायला हात सरसावतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त केली आहे.

जयंत पाटील यांच्या घरगुती गणेशाचे आज विसर्जन झाले. त्यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. या दहा दिवसात आणि त्याअगोदर झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बळीराजाला सरकारची मदत गेलेली नाही तो आजही मदतीच्या अपेक्षेत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा झाल्या मात्र आजही महाराष्ट्रातील शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या शेतकऱ्यांना अथवा शेतमजुरांना मदत मिळालेली नाही म्हणून आता किमान उसंत मिळाली असेल तर बळीराजाला मदत करायला पुढे या असेही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.