राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचा मोर्चा; सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी

महिलांचा हा मोर्चा मंत्रालयाकडे निघाल्याचे समजताच पोलिसांची तारांबळ उडाली आणि अशातच पोलिसांनी तिथे असलेल्या महिलांना अटक करण्याचा सपाटा लावला.

मुंबई: ५० खोके,माजलेत बोके, ५० खोके,एकदम ओके, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे अब्दुल सत्तार (abddul sattar) यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा. आटली की बाटली, कचकन फुटली, खोटे गुन्हे दाखल करताना लाज नाही वाटली. या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय. या घोषणांनी मंत्रालयाचा परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आज सायंकाळी शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात मंत्रालयावर मोर्चा काढत या जोरदार घोषणा दिल्या आहेत.

हे ही वाचा – अनधिकृत होर्डिंग्जना लगाम! जागा निश्चित करण्याचे पालिकांना राज्य शासनाचे निर्देश

आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसची (ncp) राज्यस्तरीय बैठक मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिलांनी कार्यालय ते मंत्रालय अशा घोषणा देत मंत्रालयाकडे कूच केले. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेली शिवीगाळ आणि शिंदे सरकार खोटे गुन्हे दाखल करत असल्याने महिलांच्या मनात प्रचंड संताप होता त्यातूनच आज राष्ट्रवादीच्या महिलांनी थेट मंत्रालयावर हल्लाबोल करत मोर्चा काढला.

राष्ट्रवादीच्या अनेक महिलांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महिलांचा हा मोर्चा मंत्रालयाकडे निघाल्याचे समजताच पोलिसांची तारांबळ उडाली आणि अशातच पोलिसांनी तिथे असलेल्या महिलांना अटक करण्याचा सपाटा लावला. मात्र पोलिसांच्या दंडेलशाहीला न जुमानता महिलांच्या या मोर्चाने मंत्रालयावर धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण आणि राज्यातील सर्व महिला पदाधिकार्‍यांनी केले. याशिवाय मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा –  तोपर्यंत नवनीत राणांविरोधात अटक वॉरंट नाही; बोगस जात पडताळणीप्रकरणी कोर्टाचा दिलासा