मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे अपघात होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र आता प्रवाशांना दिलासा देण्याचा रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत आहे. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी लोकल दाखल झाली असून मध्य रेल्वेलाही नुकतीच एक सामान्य लोकल मिळाली आहे. (New AC local trains will run on Western Railway and normal local trains on Central Railway)
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गांसाठी नवीन उपनगरीय लोकल मिळाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन एसी लोकल चालवली जाणार आहे. ही एसी लोकल गाडी मंगळवारी (19 नोव्हेंबर) रात्री विरार यार्डात दाखल झाली आहे. आठवडाभर या लोकलची चाचणी केली जाणार आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. या नव्या लोकलमुळं पश्चिम रेल्वेच्या 10 ते 12 एसी सेवांमध्ये वाढ होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा – Exit Poll : राज्यात त्रिशंकू तर अपक्षांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री…; या एक्झिट पोलची चर्चा
BREAKING! New AC EMU local for Western Railway arrives in Mumbai, non-AC local for CR.
New trains in the city after four years.
Here’s the new WR AC EMU local train standing in the Badlapur loop on its way from Chennai ICF to WR. Read here:https://t.co/Vdoj9rmLg4 pic.twitter.com/U1F3H6knnP
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) November 19, 2024
सध्या पश्चिम रेल्वेवर दिवसाला लोकलच्या एकूण 1406 फेऱ्या होतात. यात आता एसी लोकलची फेरी वाढणार असल्याने साहजिकच या मार्गावरील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे, मात्र ही गाडी जलद मार्गावर धावणार की धिम्या मार्गावर याबाबतचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे नवीन एसी लोकल कोणत्या मार्गावर धावते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा – Crime : गॅस कटरने खिडकी कापली, बँकेत प्रवेश केला अन् चोरट्यांचा जवळपास 14 कोटींच्या सोन्यावर डल्ला
मध्य रेल्वेलाही मिळाली सामान्य लोकल
दरम्यान, पश्चिम रेल्वे सोबतच मध्य रेल्वेलाही एक सामान्य लोकल मिळाली आहे. ही लोकल 12 डब्यांची राहणार आहे. चौथा कॉरिडॉर असलेल्या बेलापूर-उरण मार्गिकेवर सुरू असलेल्या जुन्या लोकलच्या जागेवर ही नवीन सामान्य लोकल धावणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. सध्या बेलापूर-उरण विभागात तीन रेट्रोफिटेड लोकलचा वापर केला जातो. त्यामुळे या तीन लोकलपैकी एक गाडी बदलून त्या जागी नवी लोकल चालवली जाणार असल्याचेही समजते.