घरमुंबईसचिन वाझेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तपास एनआयएकडे सोपवा

सचिन वाझेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तपास एनआयएकडे सोपवा

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांची मागणी

प्रसिद्ध उद्दोजक मुकेश अंबानी यांच्यासारखे उद्योजक सुरक्षित नाहीत. त्यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे सोपवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणात त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांचा घटनाक्रमासह अनेक मुद्यांवरुन सरकारवर आरोप केले. दरम्यान स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या रेतीबंदर खाडीत सापडल्याने या प्रकरणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शुक्रवारी विधानभवनात बोलावण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले की, ‘मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर रात्री एक वाजता गाडी पार्क झाली. तीन वाजता ड्रायव्हर मागच्या गाडीतून पळून गेला. एकच गाडी नव्हती, स्कॉर्पिओपाठोपाठ आणखी एक गाडी आली. दोन्ही गाड्या ठाण्यातून आल्या. ही गाडी तिथे पार्क होती, तिची ओळख पटल्यानंतर सर्वात आधी मुंबई पोलिसांचे सचिन वाझे तिथे पोहोचले. कोणीही पोहोचण्याच्याआधी ते आले, क्राईमचे पोलीस आहे, मग स्थानिक पोलीस आले. मग सचिन वाझेंना आयओ म्हणून अपॉईंट केले. तीन दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी एका एसीपींना आयओ म्हणून नेमले. सचिन वाझेंना का काढले? हे मला समजले नाही. पण यात योगायोग आहे. माझ्याकडे सीडीआर आहे, गाडीमालकाने गाडी चोरी झाल्याची तक्रार केली, ती गाडी अंबानींच्या घराबाहेर उभी होती. त्यांनी आपल्या जबाबात एक टेलिफोन नंबर सांगितला आहे. या नंबरचा एका नंबरशी संवाद 8 जून 2020 आणि 25 जुलै 2020 त्यानंतर अनेक वेळा दिसतोय.

- Advertisement -

विरोधी पक्षाने या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी, अशी मागणी विधानसभेत केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे हा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या ’एटीएस’कडून करण्यात येईल. तसेच या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.

मनसुख हिरेन यांची आत्महत्या की हत्या ?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ गाडीचा मूळ मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. मनसुख याने आत्महत्या केली का त्याचा घातपात झाला याबाबतचा कुठलाही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मुंब्रा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठवला आहे. याबाबत पोलिसांनी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

- Advertisement -

मनसुख हिरेन यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला. त्यांनी आत्महत्या केली का त्याचा घातपात करण्यात आला याचे गूढ वाढले आहे. मनसुख हिरेन हे ठाण्यातील चरई येथील विकास पाम या इमारतीच्या १४व्या मजल्यावर पत्नी आणि मुलासह राहण्यास होते. गुरुवारी रात्री ते घराबाहेर पडल्यानंतर ते परत आले नाहीत. तसेच त्यांचा मोबाईल फोन बंद लागत असल्यामुळे पत्नीने शुक्रवारी दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी सकाळी १०.25 वाजता पोलिसांना रेतीबंदर खाडीच्या गाळात रुतलेला हिरेन यांचा मृतदेह सापडला होता.

मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असताना नौपाडा पोलिसांनी हरवलेले मनसुख हिरेन यांचा शोध घेत असताना मुंब्रा पोलिसांना मिळून आलेल्या मृतदेहाची पाहणी नौपाडा पोलिसांनी केली असता मृतदेह मनसुख हिरेन यांचा असल्याची ओळख पटली. मनसुख हिरेन हे यांचा मोटारीच्या इंटिरिअल डेकोरेशनचा व्यवसाय होता. गेल्या आठवड्यात मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ मोटार मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याजवळ २५ फेब्रुवारीला बेवारस अवस्थेत सापडली होती.

तपास एटीएसकडे अनिल देशमुख यांची घोषणा

मुकेश अंबानी यांच्या ’अँटिलिया’ निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या स्कॉर्पिओचा आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिली. गृहमंत्री देशमुख म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थ सापडलेली स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. शुक्रवारी रेतीबंदर या ठिकणी हिरेन यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या अंगावर कोणत्याही खुणा नाहीत. ठाणे पोलीस त्याची चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवालात सर्व बाबी स्पष्ट होतील. मुंबई-ठाणे पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सक्षम असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

विरोधी पक्षाने या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी, अशी मागणी विधानसभेत केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे हा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या ’एटीएस’कडून करण्यात येईल. तसेच या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -