Homeक्राइमFraud : एमबीबीएसमध्ये प्रवेश देतो सांगत नऊजणांची फसवणूक; 45 लाखांच्या फसणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध...

Fraud : एमबीबीएसमध्ये प्रवेश देतो सांगत नऊजणांची फसवणूक; 45 लाखांच्या फसणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

Subscribe

एमबीबीएसमध्ये प्रवेश देतो असे सांगून नऊजणांची एका टोळीने फसवणूक केली आहे. प्रवेशासाठी घेतलेल्या सुमारे 45 लाखांचा अपहार करुन या टोळीतील चारही आरोपींनी पलायन केले आहे.

मुंबई : एमबीबीएसमध्ये प्रवेश देतो असे सांगून नऊजणांची एका टोळीने फसवणूक केली आहे. प्रवेशासाठी घेतलेल्या सुमारे 45 लाखांचा अपहार करुन या टोळीतील चारही आरोपींनी पलायन केले आहे. याप्रकणी साकीनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आराध्या चतुर्वेदी, अमित शर्मा, प्रतीक्षा आंग्रे आणि रविंदर साकेत अशी या चौघांची नावे असून ते चौघेही सेज ऍकेडमीचे प्रमुख पदाधिकारी आहे. (nine persons cheated by claiming admission in MBBS; 45 lakhs fraud case against four)

या प्रकरणातील तक्रारदार चेंबूर येथे राहत असून त्यांना अठरा वर्षांची मुलगी आहे. तिने बारावीनंतर नीटची परीक्षा दिली होती. त्यात तिला चांगले मार्क मिळाले. त्यामुळे ती वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील होती. याच दरम्यान तिला साकीनाका येथील सेंज ऍकेडमीची माहिती सोशल मिडीयावर मिळाली. या माहितीची शहानिशा केल्यानंतर तक्रारदारांनी तिथे संपर्क साधला.

हेही वाचा – Torres Scam : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांना अटक; लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक

आरोपींनी त्यांना त्यांच्या साकीनाका येथील कार्यालयात बोलाविले होते. तिथे सविस्तर चर्चा करू असे सांगितले. त्यामुळे ते नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांची चारही आरोपींशी ओळख झाली. त्यांनी त्यांच्या मुलीला सांगलीच्या एका नामांकित कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, त्यासाठी 68 लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. सुरुवातीला त्यांनी प्रोसेसिंग म्हणून पाच लाख रुपये दिले होते. मात्र ही रक्कम देऊनही त्यांच्या मुलीला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. संबंधित कॉलेजमध्ये विचारणा केल्यानंतर त्यांना सेज ऍकेडमी संस्था बोगस असून या संस्थेने आतापर्यंत अनेकांची फसवणूक केल्याचे सांगितले.

चौकशीदरम्यान त्यांच्यासह इतर आठजणांकडून या आरोपींनी पैसे घेतल्याचे समोर आले आहे. या नऊजणांकडून त्यांनी सुमारे 45लाख रुपये घेतले होते. मात्र त्यांच्या मुलांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. ही रक्कम घेतल्यांनतर ते सर्वजण कार्यालयाला टाळे लावून पळून गेले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी साकिनाका पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर आराध्या चतुर्वेदी, अमित शर्मा, प्रतीक्षा आंग्रे आणि रविंदर साकेत या चारही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – IAS Transfer : आठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; एन. नवीन सोना उपमुख्यमंत्री शिंदे यांचे प्रधान सचिव


Edited by : Ashwini A. Bhatavdekar