एखादा पेंग्विन कमी पाळा पण मुंबईतील खड्डे बुजवा; नितेश राणेंचं महापौरांना पत्र

Nitesh Rane and Mayor Kishori Pednekar
एखादा पेंग्विन कमी पाळा पण मुंबईतील खड्डे बुजवा; नितेश राणेंचं महापौरांना पत्र

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन विरोधी पक्ष भाजप सातत्याने सत्ताधारी शिवसेनेवर टीका करत आहे. दरम्यान, आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहिलं असून एखादा पेंग्विन कमी पाळा पण मुंबईतील खड्डे बुजवा, असा सल्ला दिला आहे. गेल्या तीस वर्षापासून मुंबईकरांनी शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगर पालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु या मुंबईकरांच्या विश्वसाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली, असं नितेश राणे यांनी पत्रात म्हटलं आहे.

मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती. परंतु अनेक मुंबईकरांना या खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे. आज मुंबईकर वैतागून म्हणतोय एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा, असं राणे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

२२ हजार कोटी खर्च करुनही खड्डेमुक्त रस्ते नाहीत

आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी २२ हजार कोटी खर्च करुनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत. मुंबई महानगरपालिकेनं सामान्यांनी आपल्या करातून दिलेला हा पैसा खड्ड्यात घातला की कंत्राटदारांच्या घशात? असा सामान्य मुंबईकरांच्या मनातला प्रश्न भाजप युवा मोर्चाचे तरुण विचारायला जातात. लोकशाही मार्गाने आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतात. तेव्हा आमच्यावर दंडूकशाहीचा गैरवापर करून लाठी हल्ला केला जातो, असा आरोप राणे यांनी केला.

महानगर पालिकेतील सताधारी सेना जर कंत्राटदार धार्जिणे निर्णय घेत असेल व आम्ही विचारलेल्या प्रश्नांना दाद देत नसेल तर लोकशाही मार्गाने आयुक्तांना भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु महापालिका आयुक्तही माझ्या युवा मोर्च्याच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत. याचा अर्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कंत्राटदारांच्या संगनमताने सताधारी सेनेकडून दबाव टाकला जातोय की काय? किंवा त्यामुळेच भाजप युवा मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याची महापालिका आयक्तांना भिती वाटतेय? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.