यंदाही मुंबईला तुंबई म्हणून जागतिक स्तरावर बदनाम करणार का? नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल

nitesh rane

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या तुंबईवरुन महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. मुंबईत ३८६ फ्लडींग पाईंट आहेत. तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप देण्यापलिकडे आपण काय केले आहे? का यंदाही मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात? असा सवाल नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. मुंबईत पावसाळ्यात अनेक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागतो. अनेक भागात पाणी तुंबते यामुळे जनजीवनसुद्धा विस्कळीत करते. नालेसफाईचे कामे ठेकेदार नीट करत नाही तरी त्यांनाच पालिकेकडून कंत्राट दिले जाते. यातून मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोपसुद्धा यापूर्वी भाजपकडून करण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे यांनी पावसाळ्यात मुंबईतील तुंबई होऊ नये यासाठी मुंबई महानरपालिकेला उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तसेच काही प्रश्नसुद्धा राज्य सरकारला केले आहेत. नितेश राणे यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, दरवर्षी आमच्या मुंबईची तुंबई होते. अशीच ओळख शिवसेनेने करुन ठेवली आहे. दरवर्षी या पावसाळ्यात असंख्य मुंबईकरांचे हातोनात जीव जातात. काही ठेकेदारांच्या मर्जीसाठी रंगरोटी आणि दिखाऊ कामापुढे मुंबई महापालिका काही करत नाही. यंदा राज्यात आणि मुंबईत चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती आम्हाला मिळत आहे.

मग मुंबईमध्ये जवळपास ३८६ धोक्याचे ठिकाणं आहेत. त्या ठिकाणी नुसते पाण्याचे पंप देऊन हा प्रश्न सुटणार आहे का? याबाबत मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार काही धोरण आखणार आहे का? नागरिकांमध्ये जनजागृती करणार का? की नुसती मुंबईची तुंबई होते अशी ओळख यावर्षी जागतिक पातळीवर पुन्हा करणार आहात का? हा प्रश्न मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारायचा असल्याचे निलेश राणे म्हणाले.

पावसाळ्यात अतिवृष्टीचा फटका मुंबईला मोठ्या प्रमाणात बसतो. दरवर्षी अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. हिंदमाता, सायन आणि कुर्लासह अनेक ठिकाणी पाणी साचते. यामुळे रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेकडून फ्लडिंग पॉईंट्स बसवण्यात आले आहेत. परंतु दुसरी काही व्यवस्था करणार आहात का? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

३१ मेपूर्वीच नालेसफाई

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यासाठी पालिका दोन पाळ्यांमध्ये काम करत आहेत. या सफाई कामगारांना दोन सत्रात काम करण्यास सांगितले असून त्यासाठी अतिरिक्त सामुग्रीचा वापर केला जात आहे. वसाळ्यापूर्वीच म्हणजे ३१ मेपर्यंत नालेसफाईचे ७५ टक्के काम पूर्ण होईल असं मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, एस.व्ही रोड, एलबीएससारख्या प्रमुख रस्त्यांकडे रस्त्यांखालून जाणारे कल्वर्ट असून त्यांची संख्या १२० आहे. या कल्वर्टची पाहणी केली जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा : Monsoon News : खूशखबर! महाराष्ट्रातील ‘या’ नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता