Raj Thackeray Nitin Gadkari Meet : राज ठाकरे नितीन गडकरींमध्ये डिनर डिप्लोमसी

Gadkari-meets-Raj thackeray

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याचे नेत्यांनी दिवसभर तोंडभरून कौतुक केलेले असतानाच रविवारची संध्याकाळ ही महाराष्ट्रच्या राजकारणात एक मोठी घडामोड घेऊन आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतिर्थावर आल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात ठाकरे सरकार आणि हिंदुत्वाच्या मुद्दयावर मनसैनिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याबाबत भाजपच्या अनेक नेत्यांनी भरभरून कौतुक केल्याचे दिवसभर चित्र होते. त्यातच नितीन गडकरींच्या भेटीने या दिवसभरातील सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज सायंकाळी नवी मुंबईत पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील रस्त्याच्या कामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यानंतर नितीन गडकरी यांनी थेट शिवतिर्थ गाठले. त्यामुळेच एकुणच राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे नितीन गडकरी यांच्यातील भेट मात्र नेमकी कोणत्या स्वरूपाची आहे हे स्पष्ट झाले नाही. रात्री १० वाजताच्या सुमारास नितीन गडकरी हे शिवतिर्थवर दाखल झाले. राज ठाकरे यांनी आपल्या शिवतिर्थ निवासस्थानी रहायला गेल्यापासून गडकरी हे या नव्या घराच्या ठिकाणी आले नव्हते. त्यामुळेच राज ठाकरेंच्या आमंत्रणावरूनच नितीन गडकरी शिवतिर्थावर आले असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या घरी गडकरी यांच्या आगमनाला डिनर डिप्लोमसी म्हणून मानले जात आहे.

राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांच्या निमित्ताने भाजपच्या युपीतील कामगिरीचे भरभरून कौतुक केले होते. उत्तर प्रदेशात विकास होत आहे, यावर त्यांनी आनंद व्यक्त केला होता. तसेच नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा तीन राज्यांचा विकास करावा असे मत मांडले होते. त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांचा समावेश होता. त्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये विकास होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रावरील ताण कमी होईल, असाही मुद्दा राज ठाकरे यांनी आपल्या गुढी पाडवा मेळाव्यात मांडला होता.