घरमुंबईयापुढे निवडणूक लढवणार नाही

यापुढे निवडणूक लढवणार नाही

Subscribe

ही आपली शेवटची निवडणूक असून यापुढे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथे बोलताना केली. पण, राजकारण सोडलेले नाही, असा खुलासाही त्यांनी पुढे केला.

सोमवारी मतदान पार पडल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी दुपारी अचानक पत्रकार परिषद बोलावून त्यात निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडत असल्याची धक्कादायक घोषणा केली. वसईतील राजकारण इतक्या खालच्या थरावर गेले आहे. माझ्यामुळे तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे आपण यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकूर यांनी सांगितले. यावेळी ठाकूर अतिशय भावूक झाले होते.

- Advertisement -

राजकारण कोणत्या पातळीवरचे नसावे हे नालासोपार्‍यात निवडणुकीने दाखवून दिले. एखाद्याची पत्नी जोरात ओरडून आपली व्यथा मांडते तेव्हा खूप वाईट वाटते. प्रवीणा ठाकूरनेही प्रचारात आपला पती आणि मुलाला गोळ्या मारण्याची भाषा केल्याबद्दलची व्यथा बोलून दाखवली होती. तेव्हाच मनाला वाईट वाटले. आपल्यामुळे तालुक्याची बदनामी केली जात आहे. आता खूप झाले. त्यामुळे निवडणूक न लढवता राजकारण करीत राहणार, असे ठाकूर यांनी सांगितले.

मतदानाच्या चार दिवस आधी ही घोषणा करून मी लोकांना भावनिक ब्लॅकमेल करू शकलो असतो. पण, मला मेरिटवर जिंकायचे आहे. वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीनही ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. एखादा उमेदवार पडला तर इव्हीएमचा विजय असो, असा टोलाही ठाकूर यांनी यावेळी लगावला. यापुढे लोकांमध्ये काम करणार. पाणी, आरोग्य, शिक्षण आदी सुविधांवर लक्ष देणार. येत्या पाच वर्षांत असे काम करीन की चुकीचा प्रचार करणार्‍याला मतदारच उत्तर देतील. एक वेगळा हितेंद्र ठाकूर दाखवून देईन, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

- Advertisement -

या निवडणुकीत सेना, भाजप, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी माझ्याविरोधात काम केले नाही. निवडणुकीत त्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मला मदतच केली, असा दावाही त्यांनी यावेळी केला. जिल्ह्यातील चारही जागांवर दिलेल्या उमेदवारांमुळे शिवसैनिक नाराज होते. पालघरमध्ये बाहरेचा उमेदवार दिला. बोईसरमध्ये काम न करणारा उमेदवार दिला. वसईत पैसे वाटणारा उमेदवार दिला. तर नालासोपार्‍यात गोळ्या मारणारा उमेदवार दिला. सक्षम उमेदवारांना डावलून बाहेरचे उमेदवार लादल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.

प्रदीप शर्मांना अटक झाली तेव्हा त्यांना पालकमंत्र्यांनी अडीच वर्षे हॉस्पीटलमध्ये ठेवले होते. पालकमंत्रीच असे वागत असतील तर ती दुर्दैवी बाब आहे. नालासोपार्‍यात निवडणुकीत अनेक गुंड फिरत होते. हत्यारे घेऊन बाहेरचे गुंड दहशत पसरवत होते. काहीतरी घातपात करण्याचा त्यांचा इरादा होता. एखाद्या शिवसैनिकाचा घातपात करून मला त्यात गोवण्याचाही डाव होता. त्यासंंबंधी मी तक्रार केली होती. काही पोलीस अधिकार्‍यांनी अशा प्रवृत्तींना मदत केली. तीही तक्रार मी केलेली आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.

पोलीस खात्यात असताना अनेक काळे धंदे केले आहेत. त्यासाठी सरकारी संरक्षण मिळावे म्हणूनच निवडणूक लढवली गेली, असा थेट आरोप ठाकूर यांनी शर्मा यांच्यावर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -