कोणी कितीही आदळआपट केली तरी मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वावर डाग लागणार नाही – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाल्यापासून पोलीस कर्मचारी कोविड योद्धा म्हणून काम करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शुक्रवारी पोलिसांचा गौरव करण्यात आला. मुंबई पोलीस आयुक्तालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्यांवर निशाणा साधत कोणी कितीही आदळापट केली तरी मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वावर डाग लागणार नाही, असं ठणकावून सांगितलं. पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना पोलीसही माणसं आहेत, पण तरी तुम्ही दक्ष राहाता, म्हणून आम्ही सण साजरे करु शकतो, त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून तुमचे आभार मानायला आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मुंबई पोलिसांची बदनामी करण्याऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत. तुमच्या कर्तुत्वाला तोड नाही आहे. तुमचं कर्तुत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ असल्यानंतर कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तुत्वाला कोणी डाग लावू शकणार नाही. आणि मी लावू देणार नाही,” असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

पोलीसही माणसं आहेत, पण तरी तुम्ही दक्ष राहता, म्हणून आम्ही सण साजरे करु शकतो. त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून तुमचे आभार मानायला आलो आहे. काही पोलीस कोरोनामुळे शहीद झालेत, काही हजार पोलिसांना कोरोनाने ग्रासलं. वर्क फ्रॉम होम पोलिसांनी केललं असतं तर काय झालं असतं? असं सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी केला.