घरमुंबईनायर रुग्णालयात एमआरआयसाठी टेक्निशिअनच नाही

नायर रुग्णालयात एमआरआयसाठी टेक्निशिअनच नाही

Subscribe

अनेकदा पालिका रुग्णालयात कंत्राट पातळीवर टेक्निशियन्सची नेमणूक केली जाते. त्यामुळे हे टेक्निशियन्स पालिका रुग्णालयात सहा महिन्यांपर्यंत टिकतात आणि सोडून जातात, असा आरोप नायर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

मुंबईच्या नायर रुग्णालयात ३२ वर्षीय राजेश मारु यांचा एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तब्बल ९ महिन्यांनी नायरमधीस एमआरआय मशीन सुरू करण्यात आलं. मात्र, या मशीनला हाताळण्यासाठी जो तज्ज्ञ टेक्निशियन लागतो तोच रुग्णालयात उपलब्ध नाही. याशिवाय, रुग्णांचे सिटीस्कॅन काढण्यासाठी लागणारा टेक्निशियन आणि ऑपरेशन थिएटरमध्ये आवश्यक असलेला टेक्निशियनही नायरमध्ये उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा रुग्णसेवेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ‘आपलं महानगर’ला मिळालेल्या माहितीनुसार, २००९ पासून नायर रुग्णालयात एमआरआय, सिटीस्कॅन या दोन महत्त्वाच्या विभागात टेक्निशियन उपलब्ध नाहीत. तसंच एक्स-रे प्रोसिजरसाठी आणि एँजिओग्राफीसाठी नायर रुग्णालयात फक्त २८ टेक्निशियन उपलब्ध आहेत, जे कधी कधी सिटीस्कॅन काढण्याचंही काम करतात. मात्र, एमआरआयसाठी स्पेशालिस्ट टेक्निशियनची गरज भासते, ज्यांना डॉक्टर कशापद्धतीने रुग्णांचा एमआरआय काढावा ? याचं मार्गदर्शन करतात. त्यासोबतच एमआरआय मशीनचं काम करण्यासाठी खासगी रुग्णालयात किमान दोन वर्षांचा अनुभव लागतो आणि पालिका रुग्णालयात किमान ६ महिने काम केल्याचा अनुभव लागतो. मात्र, अनेकदा पालिका रुग्णालयात कंत्राट पातळीवर टेक्निशियन्सची नेमणूक केली जाते. त्यामुळे हे टेक्निशियन्स पालिका रुग्णालयात सहा महिन्यांपर्यंत टिकतात आणि सोडून जातात, असा आरोप नायर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

निवासी डॉक्टर करतात टेक्निशियनचं काम

नायर रुग्णालयात सध्या एमआरआयसाठी टेक्निशियन नसल्याने डीएमआरडी आणि एमडी या क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन करत असलेले निवासी विद्यार्थी काम करत आहेत. या डॉक्टरांना एमआरआय कसा करावा ? हे शिकवलं जातं. त्यामुळे निवासी डॉक्टरांना ही २१ – २१ तास काम करावं लागतं, असा आरोप रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. नायर रुग्णालयाचे रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख आणि प्रोफेसर डॉ. देविदास शेट्टी यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, “२००९ पासून एकही टेक्निशियन एमआरआय आणि सिटीस्कॅनसाठी उपलब्ध नाही. याविषयी आम्हीही वारंवार प्रशासनापुढे मागणी केली आहे. पण, आता भरती प्रक्रिया सुरू आहे. एमआरआयसाठी योग्य शिक्षित व्यक्तीच लागते. त्यामुळे आम्हाला किमान ४ टेक्निशियन दिवसाला लागणार आहेत. ३ शिफ्टसाठी आणि १ त्यांना रिलिव्हर म्हणून . त्यामुळे, आता भरती प्रक्रियेत नव्याने येणाऱ्या मशीनसोबत टेक्निशियनचीही मागणी आम्ही करत आहोत. केईएममध्ये टेक्निशियन्स आणि त्यांना असिस्टंट असे मिळून ८५ जण आहेत. ”

- Advertisement -

तर याविषयी बोलताना तिन्ही पालिका रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितलं की, ”सर्वच विभागामध्ये ही समस्या आहे. सुप्रिम कोर्टाच्या वेगवेगळ्या नियमांमुळे रिक्त पदे भरण्यासाठी पोस्ट भरता येत नाहीत. मात्र, आता पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या ६ महिन्यात ही रिक्त पदे भरली जातील.”

याच विषयासंदर्भात नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -