तूर्तास पाणी कपातीचे नो टेन्शन ;तलावांत 50 टक्केपेक्षाही जास्त पाणीसाठा

तलावांत १२ जुलै २०२२ पर्यंत ७,२८,२८६ दशलक्ष लि.(५०.३२ टक्के) पाणीसाठा, मुंबईला पुढील १८९ दिवस म्हणजे १६ जानेवारी २०२३ पर्यँत पुरेल इतका पाणीसाठा

no water cut at present in mumbai More than 50 percent water balance in the ponds

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या १८ दिवसांत खूपच चांगला मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात ५,८६,८९९ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची वाढ झाली असून १० टक्के पाणीकपातही रद्द झाली. सध्या तलावांत ७,२८,२८६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील १८९ दिवस इतका म्हणजे पुढील १६ जानेवारी २०२३ पर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपातीचे संकट तूर्तास टळल्याने आता ‘मुंबईकरांना पाणीकपातीचे ‘नो टेन्शन’.

सात तलावांतून वर्षभराचा पाणीपुरवठा

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. वर्षभरासाठी तलावात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते.

१८ दिवसांत ५,८६,८९९ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात सरासरी ७० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे तलावांत १,४१,३८७ दशलक्ष लिटर म्हणजे फक्त ३६ दिवस पुरेल इतका कमी पाणीसाठा शिल्लक होता. तसेच, तलावांत अपेक्षित पाऊस न पडल्याने आणि पाणीसाठयाने तळ गाठल्याने अखेर पालिकेने २७ जूनपासून दररोजच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय २४ जून रोजी जाहीर केला होता.

मात्र २४ जून ते १२ जुलै या १८ दिवसांच्या कालावधीत चांगला मुसळधार पाऊस तलाव क्षेत्रांत पडला. तलावांत तब्बल ५,८६,८९९ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची म्हणजेच तब्बल १५३ दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ झाली आहे.

मुंबईला पुढील १८९ दिवस पुरेल इतका पाणीसाठा

सध्या सात तलावांत एकूण ७,२८,२८० दशलक्ष लिटर इतका म्हणजे मुंबईसाठी वर्षभरासाठी आवश्यक १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठयाच्या ५० टक्के पेक्षाही जास्त पाणीसाठा जमा झालेला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना पुढील १६ जानेवारी २०२३ पर्यंत पुरेल इतका आहे. तसेच, अद्यापही पावसाळ्याचे अडीच महिने बाकी आहेत. या कालावधीत आणखीन चांगला पाऊस पडला तर लवकरच तलाव एका मागोमाग एक असे ‘ओव्हरफ्लो’ व्हायला लागतील. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टळण्यास मोठी मदत होणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत ३२.५९ टक्के अधिक पाणीसाठा

गतवर्षीच्या १२ जुलै रोजीपर्यन्त तलावांत एकूण २,५२,३२३ दशलक्ष लिटर म्हणजेच १७.४३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यंदाच्या १२ जुलैपर्यन्त तलावांत एकूण ७,२८,२८६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा म्हणजेच ५०.३२ टक्के इतका जमा झाला आहे. त्यामुळे तलावांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ४, ७५,९६३ दशलक्ष लिटर इतका म्हणजे ३२.५९ टक्के इतका जास्त पाणीसाठा जमा झाला आहे.

सात तलावातील पाणीसाठा व टक्केवारी -:
———————————————————-
तलाव पाणीसाठा टक्केवारी
दशलक्ष लि.
————- ———— —————————-
उच्च वैतरणा ८६,९३० ३८.२९

मोडकसागर १,१३,१८१ ८७.७९

तानसा ८४,५५० ५८.२८

मध्य वैतरणा ९१,४५७ ४७.२६

भातसा ३,३२,५२६ ४६.३७

विहार १३,९५१ ५०.३७

तुळशी ५,६९१ ७०.७३
———————————————————-
एकूण ७,२८, २८६ ५०.३२


तानसा, मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याच्या मार्गावर; परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा