मुंबईत डेल्टा व्हेरीयंट निष्प्रभ

चिंता वाढली!

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असून तिसरी लाट धडकण्याचा इशारा तज्त्रांनी दिला आहे. याचदरम्यान, एका तपासणीत मुंबईत डेल्टा व्हेरीयंट निष्प्रभ झाल्याचे समोर आलं आहे. पहील्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ५६४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यात एकही विषाणू डेल्टा प्लसचा आढळला नाही.

यावेळी ३७४ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ३०४ नमुने डेल्टा प्रकारातील कोव्हिड व्हायरसने बाधित असल्याचे समोर आले. पण पहील्या व दुसऱ्या टप्प्यात वेगाने संसर्गित होणाऱ्या डेल्टा प्लसचा विषाणू यातील एकाही नमुन्यात आढळला नाही. अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

तसेच डेल्टाची लागण वेगाने होत असल्याने कोव्हीड नियमांचे पालन जनतेने करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ करत राहण्याच्या सूचना बीएमसी तर्फे मुंबईकरांना वारंवार देण्यात येत आहेत.

दोन टप्प्यात करण्यात आलेली चाचणी

नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये या चाचण्या करण्यात आल्या.
त्यानुसार कोरोनाचा संसर्ग झालेल्या १८८ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. ज्यात १२८ रुग्णांना ‘डेल्टा’ची लागण झाल्याचे समोर आले. तर इतर रुग्णांना सर्वसाधारण कोविड विषाणूचा संसर्ग झाला होता.

या १२८ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांपैकी ९३ नमुने मुंबईतील बाधितांचे होते. यातील ५८ टक्के जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तर ४२ टक्के रुग्ण घरातच बरे झाले. यापैकी ४७ रुग्णांनी लस घेतली होती. तर ४६ जणांनी लस घेतली नव्हती. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ४ रु्ग्णांना रुग्णालयात ऑक्सिजन लावावे लागले होते.