घरमुंबईगोपाळ शेट्टींसाठी यंदा अवघड पेपर

गोपाळ शेट्टींसाठी यंदा अवघड पेपर

Subscribe

उत्तर मुंबईचा मतदारसंघ हा विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासाठी कुणी सोपा पेपर आहे असे म्हणतो, तर कुणी लॉलीपॉप म्हणतो. तर कुणी हलवा मतदारसंघ असल्याचे संबोधतो. शेट्टी यांचा विजय हा त्रिकालबाधित सत्य आहे, असे म्हटले जाते. परंतु उमेदवारी अर्ज भरेपर्यंत हे आडाखे बांधले जात असले तरी प्रत्यक्षात ही परिस्थिती आता राहिलेली नाही. उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते उमेदवारी अर्ज भरेपर्यंत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आपला प्रभाव एवढा टाकला आहे की, शेट्टी यांच्या पोटात गोळा आला आहे. विजयाचा पल्ला मातोंडकर यांना पार करता येणार नाही, असे जरी भाजपवाल्यांना वाटत असले तरी ही समीकरणे बदलाची हवा मात्र जोरात सुरू आहे. त्यामुळे शेट्टींसाठी म्हणावा तेवढा हा सोपा पेपर राहिलेला नाही, त्यामुळे त्यांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी मागील निवडणुकीत मुंबईत सर्वाधिक मतांनी विजय मिळवला होता. देशातही ते अधिक मताधिक्क्यांनी विजय मिळवणार्‍या यादीत पाचव्या क्रमांकावर होते. पावणे पाच लाखांचे मताधिक्क्यांचा आकडा पार करणे किंवा त्याच्या आसपासही जाणे हे काँग्रेस उमेदवारांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळेच काँग्रेसचा एकही उमेदवार या मतदारसंघात उभा राहायला तयार नव्हता. काँग्रेसची ही परिस्थिती पाहून गोपाळ शेट्टी यांनी एकप्रकारे विजयोत्सव साजरा केला होता. उर्मिला मातोंडकर यांची उमेदवारी जाहीर करेपर्यंत हा विजयोत्सव होता. परंतु आपल्या काँग्रेस प्रवेशातच मातोंडकर यांनी जनतेवर एवढा प्रभाव टाकला की प्रत्येक फेरींमध्ये आणि भेटींमध्ये जनता त्यांची दिवाना झाली. प्रचाराच्या वेगवेगळ्या शक्कल लढवत मातोंडकर आपली भुरळ जनतेवर पाडत आहे. त्यामुळे कुठे तरी मातोंडकर यांच्या रुपाने उत्तर मुंबईच्या मतदारांना एक जबाबदार उमेदवार मिळाल्याची भावना निर्माण होत असून खासगी चर्चेतही मातोंडकर यांचे कौतूक जनता करताना दिसत आहे.

- Advertisement -

दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार जाहीर होईपर्यंत विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली होती. हा मतदारसंघ सोपा पेपर असला तरी अभ्यास करायचा नाही, असे काही गोपाळ शेट्टी यांचे नाही. उलट मातोंडकर यांचे नाव जाहीर होईपर्यंत ज्याप्रमाणे ते प्रचार करत होते, त्याचप्रमाणे त्यांचा प्रचार आजही सुरुच आहे. प्रचाराचा रथ त्यांचा जोरात सुरु आहे. ज्याठिकाणी ते पोहोचू शकत नाही, तिथे कार्यकर्ते प्रचार करत आहेत. त्यामुळे अधिक मताधिक्क्य मिळाल्यानंतरही त्यांनी प्रचारात बाजी मारलेली आहे. या मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात उतरले असून त्यांनी २८ अर्ज प्राप्त झालेले आहे.

या मतदारसंघात गोपाळ शेट्टी आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात सरळ लढत आहे. मात्र, यांच्या व्यतिरिक्त बहुजन समाज पार्टीचे मनोजकुमार सिंग व गणेश नलावडे, वंचित आघाडीचे सुनील थोरात आदी उमेदवार उभे आहेत. परंतु याचा परिणाम तेवढ्याप्रमाणात मतदानावर होणार नाही. या एकूण मतदारसंघाची बांधणी लक्षात घेतली, तर मालाड मतदारसंघ काँग्रेसकडे, मागाठाणे मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र, उर्वरीत दहिसर, कांदिवली पूर्व, बोरिवली, चारकोप हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. म्हणजे पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीची ताकद असल्याने विद्यमान खासदारांचा विजय पक्का मानला जात असला तरी सध्याची हवा पाहता जाणकारांचे आडाखे आता बदलू लागले आहेत. कालपर्यंत शेट्टींचा विजयाचा रथ कोणीच रोखू शकत नाही असे बोलणार्‍यांनाही आता मातोंडकरचे आव्हान मान्य करावे लागले आहे. त्यामुळे मातोंडकर ही शेट्टींना कडवी झुंज देताना विजयाचा मार्ग कशा सुकर करतील याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागून आहे. त्यामुळे शेट्टींना आता विजयासाठी घाम गाळावा लागणार आहे, उर्मिला मातोंडकर त्यांना सहजासहजी विजय मिळवू देणार नाही, हे मात्र नक्कीच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -