घरताज्या घडामोडीविनामास्क मुंबईकरांना दंडा सोबत 'मोफत' मिळणार मास्क

विनामास्क मुंबईकरांना दंडा सोबत ‘मोफत’ मिळणार मास्क

Subscribe

कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आर्थिक दंडाची कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने आता घेतला आहे. दरम्यान, विना मास्क आढळलेल्या ४ लाख ८५ हजार ७३७ नागरिकांवर कारवाई करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत सुमारे १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मार्च २०२० पासून ही मोहीम राबवली जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आतापर्यंत ४ लाख ८५ हजार ७३७ नागरिकांवर कारवाई करून सुमारे १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मात्र, ही कारवाई करताना महापालिकेचा हेतू साध्य व्हावा म्हणून नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी आयुक्तांना निवेदन देत विना मास्कच्या नागरिकांवर कारवाई केल्यानंतर संबंधित व्यक्तीला एक मास्क भेट दिले जावे, अशी मागणी केली होती. त्यांची सूचना मान्य करून आयुक्तांनी दंडात्मक कारवाई बरोबर एक मास्क भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्क देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविला जाणार आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद संबंधित दंडाच्या पावतीवरही केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -