घरमुंबई..तर डोंबिवली झाली असती बेचिराख

..तर डोंबिवली झाली असती बेचिराख

Subscribe

मेट्रोपॉलिटन एक्झिकेम कंपनीचे उत्पादन बंद करण्याची नोटीस

डोंबिवली येथील मेट्रोपॉलिटन एक्झिकेम ही रासायनिक कंपनी आगीत भसमसात झाल्यानंतर औद्योगिक सुरक्षा आणि कल्याणच्या आरोग्य संचालनालय विभागाने कंपनीचे उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच आगीचे कारण शोधण्यासाठी या विभागाकडून तांत्रिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. भीषण आगीच्या या घटनेनंतर डोंबिवलीकर भीतीच्या सावटाखाली आहेत. एक्झिकेममधील केमिकलच्या टाक्या या जमिनीखाली आहेत. या टाक्यांपर्यंत आगीची धग पोहोचली असती तर त्याच्या होणार्‍या परिणामांची परिणती ही डोंबिवलीला बेचिराखीत नेणारी झाली असती, असे आता उघड होऊ लागले आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील पाच अतिघातक कंपनी पैकी मेट्रोपॉलिटन एक्झिकेम ही एक कंपनी आहे. या कंपनीत इंटरमिडीएट व स्पेशालिटी केमिकलचे उत्पादन केले जाते. कंपनीत १८ प्रकारची उत्पादने काढली जात आहेत. या कंपनीत २५० च्या आसपास कामगार आहेत. मात्र मंगळवारी आग लागली तेव्हा १२० कामगार कंपनीत काम करीत होते. आग लागली तेव्हा कंपनीत शेकडो लिटर रसायनाचा साठा होता. मिथेनॉल टॉलविन, एएमएस केमिकलचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

कंपनीतील स्टोअर रूममधील केमिकलच्या ड्रमचे अनेक स्फोट झाले. यामुळे आग अधिकच पसरली. मात्र जमिनीखालील ज्वालाग्राही रसायनाच्या टाक्या व ओलियम रसायनाच्या टाक्या अतिसंवेदनशील मानल्या जातात. या आगीची धग जमिनीखालील टाक्यांपर्यंत पोहोचू नये, यासाठी सातत्याने प्रयत्न होत होते. त्यांना यशही आले. अन्यथा अत्यंत गंभीर परिणाम सोसावे लागले असते. या टाक्या सुरक्षित राहिल्याने अग्नीशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्वास टाकला. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागानेही संकटाची शक्यता राहिली नसल्याचे स्पष्ट केले. जमिनीखालील टाक्यांना धोका पोहोचला असता तर हानीची तीव्रता मोजता आली नसती, असेही अग्नीशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही मोठा अनर्थ टळला आहे.

तब्बल १६ तासानंतर आग आटोक्यात आली असून, अजूनही कुलिंग करण्याचं काम सुरू आहे. मात्र आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी कामगारांचा जबाब घेऊन तांत्रिक चौकशी करण्यात येणार आहे कंपनीकडून सुरक्षेचे उपाय योजण्यात आले होते की नाही, याचीही चौकशी केली जाणार आहे. मात्र एमआयडीसीत आगीचे सत्र सुरूच असल्याने डोंबिवलीकरामध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. या पार्श्वभूमीवर एक्झिकेम कंपनी बंद करून उत्पादन रोखण्याची नोटीस कल्याणच्या आरोग्य संचलनालयाने बजावली आहे. यामुळे कंपनीत काम करणार्‍या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

कंपनी बंद करण्याची नोटीस

सदर कारखाना हा एम एच कॅटगरी मध्ये येतो. त्यामुळे आवश्यक परवानग्या देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने रासायनिक प्रक्रिया सुरू असते. या आगीच्या घटनेची तांत्रिक चौकशी करण्यात येणार आहे. त्यावेळी आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. सुरक्षेच्या उपायायोजनांची कमतरता केली होती का, या सगळ्याच्या सखोल चौकशीनंतरच कारवाई करण्यात येईल. आगीच्या घटनेमुळे इमारत धोकादायक बनली आहे. त्यामुळे कंपनीला उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावली आहे. – विनायक लोंढे, संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कल्याण विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -