अखेर पालिकेत होणार प्रत्यक्ष बैठका, सरकारी परिपत्रक जारी

Not implementing old retirement plan future of 50,000 employees hangs in the balance

सध्या मुंबईत कोरोनावर नियंत्रण आले असल्यामुळे महापालिका सभागृह, स्थायी समिती व अन्य समित्यांच्या बैठका आता प्रत्यक्ष घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील परिपत्रक नगरविकास विभागाने २२ ऑक्टोबर रोजी जारी केले आहे. त्यामुळे आता पालिकेच्या विविध समित्यांच्या बैठका, पालिका सभा प्रत्यक्ष घेण्यासाठी सत्ताधारी शिवसेना व भाजप यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. यासंदर्भातील परिपत्रक भाजपने सोशल मिडिया ग्रुपवर पाठवले आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने पालिका सभा, विविध समित्यांच्या बैठका प्रत्यक्ष घेण्यास मनाई आदेश जारी केले होते. त्याला दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र आता कोरोना नियंत्रणात आल्याने सरकारने व पालिकेने लॉकडाऊन निर्बंधात काहीशी शिथिलता आणली. शाळा, थिएटर, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, कॉलेज चालू केले आहेत. त्यामुळे आता पालिका सभा, विविध समित्यांच्या बैठकाही प्रत्यक्ष घेण्यात याव्यात, अशी मागणी करीत भाजपने रान उठवले होते. त्यासाठी न्यायालयातही धाव घेतली होती.

करोनामुळे गेल्या दीड वर्षात पालिकेतील सर्व बैठका आॅनलाइन होत आहेत. मात्र आता नगरविकास खात्याने करोनाविषयक नियमांचे पालन करून पालिकेत प्रत्यक्ष बैठका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळात विविध समित्यांच्या बैठकीत व पालिका सभेत पुन्हा एकदा सेना – भाजप यांच्यात वादग्रस्त विषयांवरून प्रत्यक्ष सामना बघायला मिळणार आहे. या सरकारी परिपत्रकामुळे भाजपच्या गोटात आनंदीआनंद दिसून येत आहे.


हेही वाचा – मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत तब्बल १५६८ आगीच्या दुर्घटना