आता भांडुप पाठोपाठ मानखुर्द, गोवंडीतही खराब जेवणाची पाकिटे!

गरजवंताच्या हाती पोहोचेपर्यंत हे अन्न खराब होत आहे. परिणामी, ही अन्न पाकिटे खराब होवून अन्नाची नासाडी होत आहे.

महापालिकेच्यावतीने गरीब, गरजू आणि कष्टकऱ्यांना महापालिकेच्यावतीने दरदिवशी साडेचार लाख अन्नपाकिटांचे वाटप केले जात असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात गरजवंताच्या हाती पोहोचेपर्यंत हे अन्न खराब होत आहे. परिणामी, ही अन्न पाकिटे खराब होवून अन्नाची नासाडी होत आहे. मात्र, दिवसेंदिवस आता नगरसेवकांच्या तक्रारींचेही प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे ही अन्न पाकिटे बंद करा आणि जनतेसाठी जीवनावश्यक वस्तूंची पाकिटे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आता नगरसेवकांकडून होवू लागली आहे.

कोरोना विषाणू (कोविड-१९) संसर्गाच्‍या पार्श्‍वभूमीवर, सध्‍या लागू असलेल्‍या संचारबंदीमुळे मुंबईत अडकलेल्‍या विस्‍थापित, कष्‍टकरी कामगारांसाठी महाराष्‍ट्र राज्‍य शासनाच्‍या निर्देशाने व सहकार्याने महापालिकेने मुंबईतील सर्व २४ विभागांमध्‍ये मिळून ७३४ मोफत जेवण वाटप केंद्र सुरु केली आहेत. त्‍या माध्‍यमातून दररोज दोन वेळची मिळून सुमारे ४ लाख ६१ हजार एवढी तयार जेवणाची पाकिटे गरजूंना मोफत पुरविली जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु ही अन्नाची पाकिटे खराब असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगत भाजपच्या भांडुपच्या नगरसेविका जागृती पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र खेद व्यक्त केला. परंतु त्यानंतरही या भागातील लोकांना खराब झालेल्या अन्नाचीच पाकिटे मिळत आहेत. परंतु आता भांडुप पाठोपाठ गोवंडी,मानखुर्द या एम-पूर्व विभागातही खराब झालेली अन्न पाकिटे मिळत असल्याने शिवसेनेच्या नगरसेविकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

एम-पूर्व प्रभागाच्या अध्यक्षा वैशाली शेवाळे यांच्या प्रभागात सातत्याने खराब अन्नाची पाकिटाचे  वितरण होत आहे. परंतु आता शिवसेना नगरसेविका समृध्दी काते, समिक्षा सक्रे, ऋतुजा तारी आदींसह इतर नगरसेवकांच्या विभागातही खराब अन्नांची पाकिटे येत असून ही पाकिटे लोकांना वाटण्यापूर्वीच कचरा पेटीत फेकण्याची वेळ येत आहे.

एम-प्रभाग समितीच्या अध्यक्षा वैशाली शेवाळे यांनी यासंदर्भात बोलतांना, मागील काही दिवसांपासून खराब अन्नांचीच पाकिटे मिळत आहेत. बऱ्याच वेळा दिलेली पाकिटे आम्ही लोकांच्या हातून काढून घेतली आहे. गरीब लोकांची भुकेमुळे हे खराब अन्नही खायची तयारी असते. परंतु यामुळे जर या अन्नामुळे विषबाधा झाल्यास त्याला स्थानिक नगसेवक आणि महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले जाईल. त्यामुळे सुरुवातीला मी महापालिकेनेच या जेवणाची पाकिटांचे वाटप करावे,अशी मागणी केली होती. परंतु सातत्याने जेवणाची पाकिटे खराबच येत असल्याने मंगळवारी त्यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना पत्र पाठवून अशाप्रकारची जेवणाची पाकिटे वाटण्याऐवजी ती बंद करण्यात यावी. माझ्या विभागात जर वाटायची असतील तर महापालिका कर्मचाऱ्यांनीच वाटावी,असे सांगत त्यांनी जेवणाच्या पाकिटांऐवजी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. जेणेकरून गरजुंची गरज भागेल आणि महापालिका व नगरसेवकांवरील भार कमी होवून त्यांना दिलासाही मिळेल,असे म्हटले आहे.