मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक गेल्या दीड वर्षांपासून लांबली आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी भाजपने नागरी समस्या सोडविण्यासाठी उपनगरे विभागाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकरिता मुंबई महापालिका मुख्यालयात काही महिन्यांपूर्वीच कार्यालय मिळविले आणि भाजपच्या माजी नगरसेवकांची बसण्याची चांगलीच सोय झाली. याच कार्यालयातून सध्या पालिकेचा कारभार हाकला जात आहे. तर, सत्ताधारी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे, शिवसेनेचे मंत्री शहर विभागाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही पालकमंत्री लोढा यांच्या कार्यालयाच्या शेजारीच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वेगळे कार्यालय मिळविले आहे.(Now public court of city guardian minister Kesarkar is also held at the municipal headquarters)
बुधवारपासून याच कार्यालयाचा शुभारंभ जनता दरबाराने होणार आहे. यानिमित्ताने शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) गटाचे नगरसेवकही या कार्यालयाचा वापर करू लागतील, यात शंका नाही. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांच्या माजी नगरसेवकांना बुड टेकण्यासाठी कुठेच जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी जेव्हापासून पालिकेतील सर्वपक्षीय कार्यालये ‘सील’ केली आहेत तेव्हापासून त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना भाजप व शिंदे गटाच्या नावाने बोटे मोडण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही.
हेही वाचा : नाना पटोले यांची दिल्लीत काय पत आहे हे आधी सांगावे; राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर
आयुक्तानी केले होते राजकीय पक्षांची कार्यालये सील
मुंबई महापालिकेची पाच वर्षांची मुदत संपल्यावर विविध पक्षांचे माजी नगरसेवक तरीही आपापल्या पक्ष कार्यालयात बसत होते. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून शिवसेना शिंदे व ठाकरे गटात झालेल्या राड्याची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये सील करून बाहेरील आसनेही हटवली. माजी नगरसेवकांची एवढी गोची केली की, त्यांना पक्ष कार्यालयाबाहेर चक्क जमिनीवर बसावे लागले. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपने शक्कल लढवून मुंबईकरांच्या समस्या सोडविण्याच्या नावाखाली पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासाठी काही महिन्यांपूर्वीच नागरी समस्या सोडविण्यासाठी कार्यालय मागून घेतले. त्यामुळे पालकमंत्री लोढा हे आता शक्यतो दररोज पालिका मुख्यालयात येऊन नागरी समस्या सोडवत आहेत. पालिकेच्या विविध धोरणांबाबत जनता दरबार घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.
हेही वाचा : औषधांअभावी जीव जाणं हा कंत्राटी सरकारचा नाकर्तेपणा; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
दीपक केसरकरांनी मागून घेतले कार्यालय
आता राज्यातील सत्ताधारी व भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे शिक्षणमंत्री व शहर भागाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही मुंबईकरांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडून वेगळे कार्यालय मागून घेतले आहे. या कार्यालयाचे काम पूर्ण झाले असून आता या कार्यालयात उद्यापासून म्हणजे बुधवारपासून पालकमंत्री केसरकर हे जनता दरबाराला सुरुवात करणार आहेत. ते दर बुधवारी दुपारी 1 ते 4 वाजे पर्यंत नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून ती सोडविण्यासाठी बसणार आहेत.
दोन्ही पालकमंत्री ऐकणार जनतेची गाऱ्हाणी
आता दोन्ही पालकमंत्री जनतेची गाऱ्हाणी, समस्या ऐकणार असल्यामुळे आता पालिका आयुक्त इकबाल चहल, चार अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त, २४ वार्डाचे साहाय्यक आयुक्त आदींना कधी उपनगरे पालकमंत्री लोढा यांच्या कार्यालयात तर कधी शहर विभागाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात जनता दरबारच्या निमित्ताने हजेरी लावणे भाग पडणार आहे. यामध्ये प्रशासनाची , संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच ओढाताण होणार आहे.