मुंबईत सीलबंद इमारतींची संख्या शून्यावर!

सर्वात प्रथम मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्ण आढळणारी झोपडपट्टी किंवा इमारत सील केली जात असे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आता आटोक्यात येत असून, मुंबईतील झोपडपट्ट्यांपाठोपाठ इमारतीही प्रतिबंधमुक्त होत आहेत. मुंबईमध्ये सध्या एकही प्रतिबंधित क्षेत्र राहिलेले नसून, सीलबंद झोपडपट्टी, इमारतींची संख्या शून्यावर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला. सर्वात प्रथम मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्ण आढळणारी झोपडपट्टी किंवा इमारत सील केली जात असे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला. त्यानंतर ही लाट इमारतीमध्ये पसरली. दुसर्‍या लाटेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झोपडपट्ट्यांमध्ये कमी असली तरी इमारतींमध्ये मात्र विस्फोट झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांची कोरोना आटोक्यात आणताना चांगलीच दमछाक होत होती. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत इमारतीमध्ये २० टक्के घरांमध्ये करोना रुग्ण आढळून आल्यास इमारती सील केल्या जात होत्या. तिसर्‍या लाटेदरम्यान ६ जानेवारीला ३२ झोपडपट्ट्या आणि ५०८ इमारती सील केल्या होत्या. दरम्यान, जानेवारीच्या मध्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे १२ जानेवारीला मुंबईतील एकही झोपडपट्टी सील नव्हती, मात्र ५६ इमारती पालिकेकडून सील करण्यात आल्या होत्या. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने ११ फेब्रुवारीला मुंबईमधील सील इमारतींची संख्याही शून्यावर आली असल्याची माहिती पालिकेच्या डॅशबोर्डमधून उघडकीस आली आहे.