घरमुंबईआधारवाडी डम्पिंगवर दुर्गंधी प्रतिरोधक यंत्र बसवणार

आधारवाडी डम्पिंगवर दुर्गंधी प्रतिरोधक यंत्र बसवणार

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांचे कान टोचल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यामुळे स्थायी समिती कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवरील दुर्गंधीवर मात करण्यासाठी दुर्गंधी प्रतिरोधक मशीन बसविण्यात येणार आहे. आज स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आधारवाडी डम्पिंगच्या दुर्गंधीच्या समस्येवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत पालिका आयुक्तांना खडसावून पालिका अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचा दम भरला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कल्याण-डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या १८ लाख एवढी आहे. महापालिका क्षेत्रात दररोज ६५० मेट्रीक टन कचरा आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू निर्माण होत असल्याने उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना घडतात. तसेच डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आगीमुळे निर्माण होणारा धूर नागरिकांच्या नाका-तोंडात जात असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळेच यावर उपाययोजना म्हणून डम्पिंगवर दुर्गंधी प्रतिरोधक मशीन बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

स्थायी समितीच्या निर्णयाकडे लक्ष

त्यासाठी निविदा मागविण्यात आली. मे व्हेलोसिटी व्हेंचर्स यांची सर्वात कमी दराची सुमारे ७१ लाख ८६ हजार १९८ रकमेची निविदा स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. दरम्यान कल्याण डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असतानाही अजूनही कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे स्थायी समिती काय निर्णय घेते? याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -