Omicron Covid variant: परदेशी प्रवाशांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी, महापौर पेडणेकरांची माहिती

Chargesheet filed in 2 days in Mayor offensive statement case

दक्षिण अफ्रिकेसह युरोपीय देशात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटला मुंबईत रोखण्यासाठी एअरपोर्टवर संबंधित देशांमधून येणाऱ्या देशी- विदेशी पर्यटक, प्रवासी यांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात येत आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच, नवीन व्हेरियंटला रोखण्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या परदेशी प्रवाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना काही दिवस क्वारंटटाईन करण्याबाबत आम्ही सूचना केली असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

दरम्यान, नव्या व्हेरियंटबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत नव्या व्हेरियंटला रोखण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत सर्व कोव्हिड हॉस्पिटलचे डिन, टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कोरोनाचा नवीन व्हेरियंट ‘ओमीक्रॉंन’ चा फैलाव गेल्या काही दिवसात दक्षिण आफ्रिका, युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जीयम, जर्मनी युरोपीय देशात सुरू आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण हा चीनमध्ये आढळून आला. नंतर हाच कोरोना परदेशी प्रवाशांच्या माध्यमातून इतर देशांप्रमाणेच भारतातही मार्च २०२० ला दाखल होऊन हा हा म्हणता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोनाचा फैलाव वाढला होता.

कोरोनाला रोखण्यासाठी सध्या तरी कोणतेही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबईत पालिका आरोग्य यंत्रणेने राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध उपाययोजना करून कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला परतावून लावले. आता कोरोनावर चांगलेच नियंत्रण आलेले असल्याने सरकार व पालिका यांनी लॉकडाऊनमध्ये बऱ्यापैकी शिथिलता आणून सामान्य जनतेचे जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेलाही पालिका आरोग्य यंत्रणेने थोपवून धरले आहे. मात्र आता दक्षिण आफ्रिकेसह युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जीयम, जर्मनी आदी १२ देशांत कोरोनाच्या ‘ओमीक्रॉंन’ या नवीन व्हेरियंटचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. या नव्या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईत परदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक, प्रवासी येत असल्याचे लक्षात घेऊन मुंबईत नव्या व्हेरियंटचा प्रसार होऊ नये यासाठी परदेशातून येत असलेल्या प्रत्येक पर्यटक व प्रवासी यांची ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.


हेही वाचा : Corona Vaccination: २ लसीचे डोस घेतलेल्यांना सार्वजनिक वाहनाने प्रवास, विनामास्क फिरल्यास हजार रुपयांचा दंड