घरमुंबईऑन ड्युटी एसटी चालक, वाहकांना मोबाईल बंदी

ऑन ड्युटी एसटी चालक, वाहकांना मोबाईल बंदी

Subscribe

१ ते ६ जानेवारी दरम्यान राबवणार तपासणी मोहीम

एसटी महामंडळाचे चालक आणि वाहक हे ड्युटीवर असताना मोबाइल फोनवर बोलत असतात. त्यामुळे एसटीचे अपघात घडत आहेत. त्यामुळे एसटीच्या चालक, वाहकांना ऑन ड्युटी मोबाईल वापरास बंदीचे फर्मान एसटी प्रशासनाने जारी केले आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी १ ते ६ जानेवारी 2020 या कालावधीत विशेष मार्ग तपासणी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

या अंतर्गत ऑन ड्युटी मोबाईल वापरणार्‍या चालक, वाहकांची तपासणी करण्यात यावी तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवावा, असे देखील एसटी प्रशासनाने 26 डिसेंबर 2019 रोजीच्या परिपत्रकात नमूद केले आहे. एसटीचे चालक मोबाईलवर बोलत वाहन चालवत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाले होते, ही अत्यंत चुकीची गोष्ट असून त्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात जात आहेत. म्हणून एसटी महामंडळाने यावर तातडीने कारवाई करून यापूर्वीही यासंबंधीचे परिपत्रक काढले होते. मात्र त्यावर प्रभावी अंमलबजावणी झाली नव्हती, त्यामुळे आता महामंडळाने नव्याने परिपत्रक काढले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आढावा घेण्यात येणार आहे. या परिपत्रकावरून आता एसटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

- Advertisement -

जर एसटी बस ब्रेक डाऊन झाल्यास, काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास अशा वेळी चालक, वाहकांनी काय करावे?, चालक, वाहकांना आपल्या नातेवाईकाला अथवा नातेवाईकाने ऑन ड्युटी असलेल्या चालक अथवा वाहकाला तातडीचा निरोप देण्यासाठी काय करावे? याविषयीचा उल्लेख या परिपत्रकात का करण्यात आला नाही, अशी विचारणा एसटीचे चालक करत आहेत. चालकांना मोबाईल वापरास बंदी समजू शकतो, मात्र वाहकाला देखील मोबाईल बंदी कश्यासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोबतच मार्गात एसटीत तांत्रिक बिघाड झाला तर अशावेळी चालक, वाहकाने काय करावे? प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे का? असा प्रश्न देखील एसटी कर्मचार्‍यांनी समाजमाध्यमातून उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -