सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधींच्या फोटोला चप्पल मारली

विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले.

MLA-Rahul-Gandhi-Jode-Maro-Andolan

विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी राहुल गांधी परदेशात केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी आक्रमक झालेले पहायला मिळाले तर दुसरीकडे 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. त्यामुळे इथलं वातावरण काहीसं तापलेलं दिसून आलं.

आज विधिमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं. सत्ताधारी पक्षातील आमदारही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस नेते राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करत आहेत. त्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे असून ते देशाचा अपमान करत आहेत. लंडनमध्ये देशाची बदनामी केल्यामुळे राहुल गांधी जाहीर माफी मागावी, अशी मागणी यावेळी सत्ताधारी आमदारांनी केली. सत्ताधारी आमदारांनी पायऱ्यांवर बसून हातात काही बॅनर्स झळकावले. या बॅनर्सवर राहुल गांधी यांचा फोटो होता. “तेलाच्या घाण्याला जुंपा फक्त एक दिवस, तेव्हाच कळेल सावरकरांच्या त्यागाची किंमत’ असं या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं. यावेळी सत्ताधारी आक्रमक प्रचंड आक्रमक झाले. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी तर या बॅनर्सवरील राहुल गांधी यांच्या फोटोला चप्पल मारत निषेध व्यक्त केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचा निषेध असो अशा घोषणाही यावेळी सत्ताधारी आमदारांनी दिल्या.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं जोडे मारो आंदोलन सुरू असातान दुसरीकडे बाजुलाच उभे असलेले विरोधकही चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. यावेळी विरोधक आमदारांनी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणांनी विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला होता. गॅस दरवाढ, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई या मुद्द्यावरून विरोधकांची जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यामध्ये अजित पवार, अंबादास दानवे, नाना पटोले, अशोक चव्हाण, छगन भुजबळ. बाळासाहेब थोरात हे देखील सहभागी झाले होते.