घरताज्या घडामोडीआसनगाव स्थानकात मालगाडीचे इंजिन नादुरुस्त, दीड तास वाहतूक ठप्प

आसनगाव स्थानकात मालगाडीचे इंजिन नादुरुस्त, दीड तास वाहतूक ठप्प

Subscribe

मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळ मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास डाऊन मार्गावर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने तब्बल दीड तास वाहतूक ठप्प झाली. या दरम्यान आसनगाव व कसारा या दोन लोकल रद्द करण्यात तर लांबपल्ल्याच्या गाड्यांचीही रखडपट्टी झाली. वासिंद रेल्वे स्थानकातून अन्य इंजिन उपलब्ध करण्यात आल्यानंतर तब्बल दीड तासाने मालगाडी कसार्‍याकडे रवाना झाली. चाकरमानी प्रवाशांना मात्र रेल्वेच्या या ढिसाळ कारभाराचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

कोरोना कालावधीत रेल्वेच बंद असल्याने एक्स्प्रेस किंवा मालगाडीचे इंजिन फेल होण्याचे प्रकार गेले काही महिने घडलेच नाहीत. आता पुन्हा मालगाडीचे इंजिन बंद पडण्याचे प्रकार सुरू झाले असल्याचे या प्रकाराने समोर आले आहे. रेल्वे प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने पहात नसल्याने प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दुपारी दोनच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्थानकाच्या होम सिग्नल जवळ डाऊन मार्गावर एका मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसार्‍याकडे जाणारी रेल्वे वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती.

- Advertisement -

वासिंद स्थानकावरून अन्य इंजिन उपलब्ध केल्यानंतर साडेतीनच्या सुमारास मालगाडी कसार्‍याकडे रवाना झाली. त्यानंतर वाहतूक सुरू झाली असली तरी या दरम्यान आसनगाव व कसारा अशा दोन लोकल रद्द करण्यात आल्याने चाकरमानी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तर मालगाडीच्या मागे असलेल्या एका कसारा लोकलसह मंगला एक्स्प्रेस, लखनौ एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांचीही रखडपट्टी झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -