घरठाणेएक दिवस सत्तेत येणार - राज ठाकरे

एक दिवस सत्तेत येणार – राज ठाकरे

Subscribe

भरतीनंतर ओहोटी येणार ,भाजपला इशारा

मनसेच्या सभेला गर्दी होते, पण मते मिळत नाहीत हा प्रोपोगेंडा आहे. आपली सत्ता नसताना सभेला होणारी गर्दी हीच पक्षाची ऊर्जा आहे. सध्याच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. त्यामुळे मनसे सत्तेपासून दूर नाही. एक दिवस आपलीदेखील सत्ता येणार आहे, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत कार्यकर्त्यांना गुरुवारी दिला.

मनसेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माझ्या वाट्याला गेल्यामुळेच मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले, असा टोलाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. यावेळी मनसेच्या १७ वर्षांच्या काळातील आंदोलनांचा आणि जनतेच्या सोडवलेल्या प्रश्नांचा धावता आढावा घेणार्‍या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन झाले.

- Advertisement -

माझ्या कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. आधी ज्यांनी हे हल्ले केले त्यांना समजेल, मग इतरांना समजेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी भरसभेत दिला. राज ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपला सत्तेत येण्यासाठी ६० वर्षे लागली. पक्ष चालवताना खस्ता खाव्या लागतात. महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू आहे इतके गलिच्छ आणि खालच्या थराचे राजकारण मी माझ्या आयुष्यात पाहिलेले नाही. महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचे काम सध्या सुरू आहे. राजकारणातील भाषा, आरोप-प्रत्यारोपाची पातळी खालावली आहे.

या राजकारणाला जनता कंटाळली आहे. आपल्याला लोकांपर्यंत पोहचायचे आहे. निवडणुका कधीही लागतील. आपल्याला सर्व महापालिका जिंकायच्या आहेत. निवडणुकांचे दहावीच्या परीक्षेसारखे झाले आहे. कधी म्हणतात मार्चमध्ये तर कधी ऑक्टोबरमध्ये असे सुरू आहे. भरतीनंतर ओहोटी येत असते. त्यामुळे मनसे सत्तेपासून दूर नाही, असा विश्वास राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

- Advertisement -

महापुरुषांचे केवळ पुतळे उभारून काहीही साध्य होणार नाही. दादरच्या इंदू मिलच्या जागेवर जगातील सर्वात मोठे अभ्यास केंद्र व्हावे. तेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खर्‍या अर्थाने स्मारक असेल या मुद्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चौथ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मोहम्मद हनीफ खान उर्फ पप्पू खान असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी विकास चावरिया, अशोक शंकर खरात आणि किसन पुरुषोत्तम सोलंकी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मार्निंग वॉकसाठी गेलेल्या संदीप देशपांडे यांच्यावर चार जणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -