मुंबई (मारूती मोरे) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या ताफ्यातील एका बसगाडी चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस आगारात उभ्या असलेल्या बसने चालकाविना पुढे धाव घेत चहाच्या टपरीला धडक दिल्याची अजब घटना विक्रोळी (पूर्व) कन्नमवार नगर येथे आज, शनिवारी (11 जानेवारी) घडली. या अजब अपघातात एक कामगार जखमी झाला असून चहाच्या टपरीसह बेस्ट बसचेही नुकसान झाले आहे. अपघातावेळी बसगाडीमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. (One injured in BEST bus accident at Vikhroli depot)
शनिवारी दुपारी 11.25 वाजण्याच्या सुमारास बेस्ट उपक्रमातील डागा ग्रुपची भाडेतत्त्वावरील घाटकोपर बस आगाराची एक बस ( बसमार्ग क्रमांक 185) ही आगरकर चौक येथून विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर डेपो येथे चालक संतोष देऊळकरने (45) उभी केली. तो चालक बस उभी करून लघुशंकेसाठी तसेच पुढे बस प्रवर्तकाकडे बसची वेळ घेण्यासाठी गेला, मात्र त्यावेळी त्याने उभ्या केलेल्या बसगाडीला हॅण्ड ब्रेक लावला नव्हता. त्यामुळे सदर बसगाडी चालकाविना तशीच 40 मीटरपर्यंत पुढे गेली. या बसने चालक गाडीत नसताना समोरील चंद्राकांत सावंत यांच्या जनरल स्टोअरला धडक दिली. यावेळी सदर बसने एका कामगारालाही धडक दिली. अधिक चौकशीनंतर बसचालकाने बसगाडीला हॅण्ड ब्रेक न लावल्याने गाडी बसचालकाशिवाय पुढे गेली व जनरल स्टोअर आणि तेथे एका कामगाराला धडकल्याची सत्यता समोर आली.
हेही वाचा – Mumbai Metro : मुंबई मेट्रोने गाठला महत्त्वाचा टप्पा, मार्गिक 7 आणि 2 एला सीसीआरएसची नियमीत मंजुरी
या घटनेत लिफन राणा (20) हा कामगार जखमी झाल्याची बाब समोर आली. या अपघातात लिफनच्या डाव्या हाताला मार लागला आहे, पण त्याने रुग्णालयात उपचारासाठी जाणे टाळले आहे. तसेच पोलिसात या अपघाताची तक्रारही दाखल केली नाही. मात्र त्याने स्वत:हून तक्रार दाखल केल्यास बसचालक आणि वाहक यांना पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर व्हावे लागेल, अशी तंबी पोलिसांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यात कुर्ल्यात बसची एकाला धडक
दरम्यान, कुर्ला (प.) येथील ज्या स.गो. बर्वे मार्गावर 9 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास बेस्टच्या भाडे तत्वावरील एका बसगाडीच्या चालकांचे बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेला आणि 40 जण जखमी झाले होते, त्याच रस्त्यावर बौद्ध कॉलनी समोर बेस्टच्या एका बसगाडीने सकाळी 11.25 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला धडक दिली होती. सुदैवाने या अपघातात ती व्यक्ती केवळ जखमी झाल्याने बचावली. अन्यथा बेस्ट बसची वाहतूक त्याच रस्त्याने सुरू ठेवणे बेस्ट उपक्रमासाठी मुश्किल झाले असते. ही घटना घडून दोन दिवस उलटत असतानाच आज सकाळी विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे बेस्ट बसचा अपघात झाला.
हेही वाचा – Torres Scam : टोरेस घोटाळ्यातीस तपासाला वेग; आणखी तीन जणांना अटक