Lockdown – ७३ लाख ग्राहकांनी भरली ‘ऑनलाईन’ वीजेची बीलं!

'लॉकडाऊन'मुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे.

Mahavitaran Light Bill
महावितरण लाईट बिल

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या राज्यातील ‘लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्या घरगुती ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी पसंती दिली आहे. लघुदाब वर्गवारीतील ७३ लाख २९ हजार वीजग्राहकांनी घरबसल्या गेल्या महिन्यात १२२७ कोटी २५ लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. यामध्ये सर्वाधिक पुणे परिमंडलातील १३ लाख ५० हजार तसेच भांडूप परिमंडलातील 11 लाख वीजग्राहकांचा समावेश आहे.

राज्य सरकारमार्फत १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र देखील बंद आहेत. मात्र वीजग्राहकांनी महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.

गेल्या मार्च महिन्यात ७३ लाख २९ हजार ग्राहकांनी घरबसल्या १२२७ कोटी २५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला. ‘लॉकडाऊन’मुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. मात्र मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट व मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत.

परिमंडलनिहाय ग्राहकसंख्या व रक्कम पुढीलप्रमाणे –

पुणे– १३.५० लाख – २६६.२९ कोटी, भांडूप– १०.९९ लाख – २३३.६० कोटी, कल्याण– १०.२५ लाख – १६४.३९ कोटी, नाशिक– ५.६५ लाख – ९४.४१ कोटी, बारामती– ५.६३ लाख – ७१.०९ कोटी, कोल्हापूर– ४.२२ लाख – ८४.९६ कोटी, नागपूर– ४.०५ लाख – ७०.७५ कोटी, जळगाव- ३.२५ लाख – ४७.८७ कोटी, औरंगाबाद– २.३० लाख – ४३.७५ कोटी, अकोला– २.२७ लाख – २७.१० कोटी, अमरावती- २.२१ लाख – २३.४८ कोटी, लातूर- १.९२ लाख – २५.५३ कोटी, कोकण- १.८८ लाख – २२.९२ कोटी, चंद्रपूर- १.७९ लाख – १५.३६ कोटी, गोंदिया- १.७९ लाख – १२.८२ कोटी, नांदेड- १.५८ लाख – २२.९१ कोटी.