घरमुंबईकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेट गुंडाळण्याचा मुंबई विद्यापीठाचा डाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेट गुंडाळण्याचा मुंबई विद्यापीठाचा डाव

Subscribe

मुंबई विद्यापीठाकडून २५ ऑगस्टला सिनेट सभा झूम अ‍ॅपद्वारे घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून ही सभा गुंडाळण्याचा डाव असल्याचा आरोप सिनेट सदस्यांकडून करण्यात येत आहे

मुंबई विद्यापीठाकडून २५ ऑगस्टला सिनेट सभा झूम अ‍ॅपद्वारे घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून ही सभा गुंडाळण्याचा डाव असल्याचा आरोप सिनेट सदस्यांकडून करण्यात येत आहे. अनेक सदस्य हे गावी गेले असून, त्यांना नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सिनेटमध्ये सभागृहाची विविध आयुधे वापरूनही अनेकदा प्रशासन दखल घेत नाही, त्यामुळे झूम अ‍ॅपवरील बैठकीतून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत विद्यापीठ प्रशासन गांभीर्य दाखवले का असा प्रश्न सिनेट सदस्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

सभागृहातील आयुधांचा वापर करता येणार नाही

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार वर्षातून दोन वेळा सिनेट सभा घेणे विद्यापीठांना बंधनकारक असते. त्यानुसार पहिली सिनेट १३ मार्चला झाल्यानंतर दुसरी सिनेट सभा २५ ऑगस्टला झूम अ‍ॅपद्वारे घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने जाहीर केला आहे. परंतु हा निर्णय म्हणजे प्रश्न सोडवण्याऐवजी गुंडाळण्याचा प्रकार आहे. झूम अ‍ॅपवरील बैठकीत सदस्यांना त्यांच्या सभागृहातील आयुधांचा वापर करता येणार नाही. झूम अ‍ॅपवर हरकतीचे मुद्दे कसे मांडायचे आणि स्थगन प्रस्ताव कसे मांडायचे, एखाद्या मुद्द्यावर प्रशासन ऐकत नसेल तर सभागृह स्थगित कसे करायचे असे प्रश्न सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे एखाद्या विषयावर कुलगुरूंना उत्तर द्यावयाचे असल्यास त्यांना संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांकडून माहिती पुरवण्यात येते. त्यामुळे या सभेत अनेक प्रश्नांना फाईल विद्यापीठात असल्याचे उत्तर आम्हाला ऐकावे लागेल. विद्यापीठाचे सभागृह हे भले मोठे आहे. त्यामध्ये तीन मीटरपर्यंतच्या अंतरावर सोशल डिस्टन्सिंग पाळत सिनेट घेणे शक्य आहे. त्यामुळे झूप अ‍ॅपचा खटाटोप करून विद्यापीठाला सिनेट गुंडाळायची आहे का? असा प्रश्न करत त्यांनी थोरात यांनी केला.

- Advertisement -

ऑनलाईन सिनेटमधून प्रश्न सोडवणे अशक्य

२५ ऑगस्टला घेण्यात आलेली सिनेट ही घाईगडबडीत आटोपण्यासाठीचा प्रयत्न आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि २२ ऑगस्टपासून सुरू होणारा गणेशोत्सव यामुळे अनेक सदस्यांना सभेला उपस्थित राहणे अवघड होणार आहे. अनेक सदस्य हे लॉकडाऊनच्या काळामध्ये गावी गेले असून, त्यांना तिथे नेटवर्कची समस्या असल्याने त्यांना झूमद्वारे उपस्थित राहणे शक्य नाही. झूमद्वारे सदस्यांना आपली मतेही मांडण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. ऑनलाईन सिनेटमधून प्रश्न सोडवणे शक्य नसल्याने सिनेट सभागृहातच घ्यावी, असे सांगत सिनेट पुढे ढकलण्याची मागणी सिनेट सदस्य डॉ. सुप्रिया करंडे यांनी केली. २५ ऑगस्टला होणारी सिनेट पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र सिनेट सदस्य प्रदीप सावंत, अ‍ॅड. वैभव थोरात, डॉ. सुप्रिया कारंडे, प्रवीण पाटकर, धनराज कोहचाडे, शशिकांत झोरे, राजन कोळंबकर व मिलिंद साटम या सदस्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना दिले आहे.

बजेट सिनेटलाही कोरोनाचा फटका

मुंबई विद्यापीठाचे १३ मार्चला अर्थसंकल्पीय सिनेट झाले होते. यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा फार काळ चालवणे योग्य ठरणार नाही, असे सांगत सदस्यांना स्थगन प्रस्ताव मांडू दिले नव्हते. तर काहींना एकच प्रस्ताव मांडण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे दुसरी सिनेट झूम घेण्यात येऊ नये अशी मागणी सदस्यांनी केली.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -