डॉक्टरांविरोधातल्या तक्रारींसाठीचं वेब पोर्टल सुरू!

वैद्यकीय व्यावसयिकांची नोंदणी करणे आणि डॉक्टरांबाबतच्या आलेल्या तक्रारींची सुनावणी करणे हे परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर हे ऑनलाईन वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे.

Online Web Portal

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेकडून डॉक्टरांच्या नोंदी आणि त्यांच्याविरोधातल्या तक्रारींसाठी ऑनलाईन वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. वैद्यकीय व्यावसयिकांची नोंदणी करणे आणि डॉक्टरांबाबतच्या आलेल्या तक्रारींची सुनावणी करणे हे परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर हे ऑनलाईन वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. राज्यातील नोंदणीकृत डॉक्टरांच्या विरोधात निष्काळजीपणाच्या अनेक तक्रारी दाखल होतात. त्या तक्रारींची योग्य पद्धतीने नोंद रहावी यासाठी हे ऑनलाईन वेब पोर्टल सुरू करण्यात आलं असल्याचं महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितलं.

कारभारात पारदर्शकता येणार?

शासनाच्या ‘डिजिटल क्रांती’ या संकल्पनेच्या माध्यमातून हे वेब पोर्टल सुरू केलं असून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मंगळवारी या वेब पोर्टलचं अनावरण करण्यात आलं. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितलं की,”परिषदेकडे नोंदणीकृत असलेल्या डॉक्टरांविरोधात येणाऱ्या तक्रारी नोंदवण्यासाठी हे वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. कोणत्याही डॉक्टर विरोधात झालेल्या प्राप्त तक्रारीची चौकशी आणि सुनावणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ कलम २२ अंतर्गत करण्यात येणार आहे. तक्रारदाराच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी शिवाय कागदोपत्री व्यवहार टाळण्यासाठी, पारदर्शकता येण्यासाठी या वेब पोर्टलचा नक्कीच फायदा होईल.”


हेही वाचा – शताब्दी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले काम बंद आंदोलन

ऑनलाईन वेब पोर्टलचे फायदे

  • पारदर्शक आणि प्रभावी तक्रार व्यवस्थापन
  • कागदपत्र पद्धतीऐवजी तंत्रज्ञान आणि संगणकीय माहितीचा वापर
  • तक्रारींना तात्काळ प्रतिसाद
  • तक्रारदाराला आणि नोंदणीकृत डॉक्टरांना तक्रारींची सद्यस्थिती समजण्यासाठी
  • तक्रारदाराच्या निदानासाठी आऊटलेट म्हणून