New Year 2023 : मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ निर्णय, खुल्या दुमजली बसमधून करा नवीन वर्षाचे स्वागत

New Year 2023 : मुंबईकरांना गंतव्य स्थानकापर्यंत पोहोचण्याकरता बेस्टने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर रोजी बेस्ट ५० जादा गाड्या सोडणार आहे. तसंच, बेस्टची खुली दुमजली बसही सोडण्यात येणार आहे.

open double decker best bus

मुंबई – अवघ्या काहीच तासांत २०२२ वर्ष संपून २०२३ वर्षाला प्रारंभ होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी अनेक प्लान्स आखले असतीलच. नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता मुंबईकर समुद्रकिनारी, हॉटेल, क्लबला पसंती देतात. मुंबईकरांना गंतव्य ठिकाणापर्यंत पोहोचण्याकरता बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि विद्युत परिवहन उपक्रमने (BEST) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर रोजी बेस्ट ५० जादा गाड्या सोडणार आहे. तसंच, बेस्टची खुली दुमजली बसही (Open Double Decker Best Bus) सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी मुंबईकर जनतेच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमामार्फत उशिरापर्यंत जादा बसगाड्या चालविण्यात येतात. यंदा आठवडाभर आधीच झालेली पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने मुंबईतील विविध भागात ३१ डिसेंबर रोजी मागील वर्षाीपेक्षा दुप्पट म्हणजेच एकूण ५० जादा बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

तसंच, बेस्टची दुमजली बस आणि गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण ठरलेली बेस्टची खुली दुमजली बस प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारी २०२३ च्या पहाटेपर्यंत चालविण्यात येणार आहे. त्यामुळे आता नवीन वर्षाचे स्वागत आणि नव्या वर्षाचा सूर्योदय पाहण्याची सुवर्णसंधी मुंबईकर जनता आणि पर्यटकांना बेस्टच्या खुल्या दुमजली बसमधून मिळणार आहे.

रेल्वेही धावणार

मुंबईकरांच्या सोयीसाठी केवळ बेस्टनेच नव्हे तर रेल्वेनेही मध्यरात्री रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरून विशेष रेल्वे धावणार आहे.

मध्य रेल्वे

३१ डिसेंबर – १ जानेवारीच्या मध्यरात्री १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याण लोकल सुटेल. ही लोकल रात्री ३ वाजता कल्याण येथे पोहोचेल.

३१ डिसेंबर – १ जानेवारीच्या मध्यरात्री १.३० वाजता कल्याण येथून विशेष ट्रेन सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३ वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन

३१ डिसेंबर – १ जानेवारीच्या मध्यरात्री १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल विशेष ट्रेन सुटेल. ०२.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

३१ डिसेंबर – १ जानेवारीच्या मध्यरात्री १.३० वाजता पनवेल येथून विशेष ट्रेन सुटेल. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.५० वाजता पोहोचेल.