घरमुंबईदेशातील 15 लाख शाळांमध्ये राबवणार ऑपरेशन डिजिटल बोर्ड

देशातील 15 लाख शाळांमध्ये राबवणार ऑपरेशन डिजिटल बोर्ड

Subscribe

विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण डिजिटल करण्यासाठी देशातील 15 लाख वर्ग खोल्यांमध्ये ‘ऑपरेशन डिजिटल बोर्ड’ संकल्पना राबवण्यात येणार आहे. नववी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ही संकल्पना राबवून शिक्षणाचे नवे प्रारूप सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुंबईत केली. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या परीक्षा घेण्यासाठीचे विधेयक आम्ही लवकरच आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी शालेय शिक्षण विभागाकडून स्थापन केलेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ व त्याअंतर्गत 13 भारतरत्न अटल बिहारी आंतरराष्ट्रीय शाळांचे उद्घाटन सह्याद्री अतिथिगृहात करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी जावडेकर बोलत होते. आमच्या लहानपणी शाळांमध्ये फळा नसल्याने ‘ऑपरेशन ब्लॅक बोर्ड’ ही संकल्पना राबवण्यात येत होती. मात्र आता डिजिटलचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्यामुळे आम्ही देशातील 15 लाख वर्ग खोल्यांमध्ये ‘ऑपरेशन डिजिटल बोर्ड’ ही संकल्पना राबवणार आहे. या संकल्पनेचा फायदा देशातील नववी ते पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम हा आयात केलेला नसून तो निर्यात करण्यालायक आहे. बोर्डाचा अभ्यासक्रम हा पूर्णपणे वेगळा असून यामध्ये विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख, परिसराची ओळख करण्याबरोबरच तीन ते आठ वर्षांपर्यंत त्यांचा कौशल्य विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षक महत्त्वाचे असल्याने त्यांची योग्य प्रकारे निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाचा स्तर कायम राहावा यासाठी देशातील 25 राज्यांमधून परीक्षा घेण्याची मागणी होत होती. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होणे गरजेचे असल्याने आम्ही पाचवी ते आठवीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसे विधेयक लवकरच आणणार असल्याचे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी टिकून राहावेत यादृष्टीने हे बोर्ड सुरू करण्यात आले आहे. लोकल टू ग्लोबल असा विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही या शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये कोणत्याही बोर्डाच्या अभ्यासक्रमाची सरमिसळ केलेली नाही. आंतरराष्ट्रीय बोर्डासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.

- Advertisement -

अभ्यासक्रम मंडळाचा सत्कार
अटल बिहारी वापजेयी आंतरराष्ट्रीय शाळा नियामक मंडळाचे सदस्य शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक, डॉ. स्वरुप संपत, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक किर्तीचे तज्ज्ञ डॉ. विजय भाटकर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुलेखनकार अच्युत पालव आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच अभ्यासक्रम निर्मिती सदस्य गीतांजली, फ्रान्सिस जोसेफ, प्राची साठे यांचाही सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचाही सत्कार करण्यात आला.

राज्यात लाखभर तंत्रस्नेही शिक्षक
व्यक्तीची क्षमता समजून त्याला वाव देणारे तसेच प्रत्येक गोष्टीची माहिती असणारा विद्यार्थी घडवण्यावर आंतरराष्ट्रीय शाळेत भर देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळेत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. त्यातूनच राज्यात लाखभर तंत्रस्नेही शिक्षक घडले असून त्यांनी आठ हजार अ‍ॅप बनवले आहेत. या अ‍ॅपमुळे शिक्षणात अमुलाग्र बदल झाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -