घरमुंबई६० हजार झोपडीधारकांचा बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाला विरोध

६० हजार झोपडीधारकांचा बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाला विरोध

Subscribe

झोपडपट्टीवासीयांच्या विरोधामुळे डेडलाईन हुकली

मुंबईतल्या झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करण्याच्या बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाला मुंबईतील ६० हजार झोपडीधारकांनी विरोध केला आहे. पश्चिम उपनगरातून या बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाला विरोध होत आहे. त्यामुळेच मुंबईतील झोपडीधारकांची डिजिटल पद्धतीने बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची डेडलाईन चुकली आहे. तीन वर्षात मुंबईतील साडेसात लाख झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्व्हेक्षण पूर्ण होणे अपेक्षित होते. पण सर्व्हेक्षणादरम्यान स्थानिक पातळीवर होणारा विरोध पाहता प्रत्यक्षात २ लाख ६३ हजार ७४४ झोपडीवासीयांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. सर्व्हेक्षणाला झालेल्या विरोधामुळेच हे काम डेडलाईनपेक्षा आणखी काही वर्षांनी लांबणार आहे. शिवाय दिवसेंदिवस मुंबईत वाढणार्‍या झोपड्यांची संख्याही सर्व्हेक्षणाचे काम आणखी उशिरा पूर्ण होण्यासाठी कारण ठरत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत आता हे काम वेगाने करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबई उपनगरात अनेक ठिकाणी बायोमेट्रिक सर्व्हेक्षणादरम्यान झोपडीवर नंबर टाकण्याच्या कामापर्यंत विरोध होत नाही. पण एकदा झोपडीला नंबर टाकण्याची प्रक्रिया झाली की स्थानिक पातळीवर विरोध सुरू होतो. मुंबईतील ३ लाख २३ हजार २०२ झोपड्यांवर नंबर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पण बायोमेट्रिक सर्वेक्षणादरम्यान लिडार आणि ड्रोनचा वापर करून फक्त २ लाख ६३ हजार ७४४ झोपड्यांचेच बायोमेट्रिक सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्व्हेक्षण न होण्यासाठी अनेक कारणे पुढे आली आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान झोपडीधारक प्रत्यक्ष घरामध्ये हजर नसतात. अनेक झोपडीधारकांनी झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्व्हेक्षण करण्यासाठी विरोधही केला आहे. तर अनेक झोपड्या या मूळ मालकाने भाड्याने दिल्याने त्या ठिकाणचे बायोमेट्रिक सर्व्हेक्षण पूर्ण होत नाही.
असे होते बायोमेट्रिक सर्व्हेक्षण झोपडीधारकांच्या बायोमेट्रिक सर्व्हेक्षणासाठी एसआरएची नेमणूक करण्यात आली आहे.

- Advertisement -

उपजिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार तसेच सक्षम प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार झोपडीधारकांची पात्रता निश्चितीसाठी बायोमेट्रिक सर्व्हेक्षण करण्यात येते. त्यामध्ये टॅबलेटचा वापर करून झोपडीधारकांची माहिती गोळा करण्यात येते. त्यासाठी आधार लिंकच्या सहाय्याने डेटा गोळा करण्यात येतो. तसेच झोपडीतील वास्तव्याच्या पुराव्याशी संबंधित डेटा गोळा करण्यात येतो.हा डेटा एसआरएच्या डेटा सेंटरमध्ये रिअल टाईम पद्धतीने स्टोअर होतो. तर ऑफलाईन पद्धतीनेही झोपडीधारकाकडे उपलब्ध कागदपत्रांच्या झेरॉक्स एसआरएच्या बायोमेट्रिक टीमकडून गोळा करण्यात येतात. सर्व्हेक्षणादरम्यान प्रत्येक झोपडीला विशिष्ट (युनिक) क्रमांक देण्यात येतो. लाल रंगाने प्रत्येक झोपडीवर हा क्रमांक टाकण्यात येतो. त्यानंतर लाईट डिटेक्शन आणि रेंजिंग (लिडार) तंत्रज्ञानाने झोपडीचे मॅपिंग करण्यात येते. मल्टी कॅमेरा असलेले हे बॅगपॅक असे तंत्रज्ञान आहे.

त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील गल्लीबोळाचेही मॅपिंग करणे शक्य होते. घरातल्या जागेचा अंदाज घेण्यासाठी एक व्हिडिओ तयार करण्यात येतो. तसेच झोपडीधारकाचा एक फोटो आणि झोपडीचा एक फोटो घेण्यात येतो. ज्याठिकाणी झोपड्यांची संख्या वाढती आहे अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येतो. त्यामुळे झोपडपट्टीची ठराविक संख्या निश्चित होण्यासाठी मदत होते. एक झोपडीच्या सर्व्हेक्षणासाठी सरासरी २० ते २५ मिनिटे इतका वेळ लागतो.

- Advertisement -
पश्चिम उपनगरातून होत आहे विरोध

प्रकल्प    झोपडीधारक  सर्व्हेक्षण पूर्ण
वांद्रे (१)     ४७९६        १३००२
वांद्रे (२)     ११७०४       ९५६९
अंधेरी (१ )  १९८७९       १५९४२
अंधेरी (२)   २०२०८       १६९८०
मालाड (१)  १२६४१       ९६४१
मालाड (२)  ५६७०        ५२६२
मालाड (३)  २२८४४       २०८२६
बोरिवली (१) १६५२१       १३४०१
बोरिवली (२) १८२०४      १५८३८

एसआरए बायोमेट्रिक टीमवर हल्ल्याचे प्रकार

वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली या भागातून जवळपास ६० हजार झोपडीधारकांनी बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी विरोध केला आहे. अनेक ठिकाणी विकासकामार्फत सर्व्हेक्षण होणार असल्याचे कारण देत बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाला विरोध होत आहे. तर काही ठिकाणी सर्वेक्षणासाठी जाणार्‍या एसआरएच्या नेमलेल्या टीमला स्थानिकांनी विरोध केला आहे. काही ठिकाणी या बायोमेट्रिक सर्व्हेक्षण करणार्‍या टीमवर हल्ला करण्याचे प्रकारही समोर आल्याने सर्व्हेक्षण धीम्यागतीने सुरू आहे.

झोपडीधारकांची पात्रता निश्चितीकरणामध्ये त्याचे बायोमेट्रिक सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांची वाढती संख्या पाहता झोपडीधारकाची पात्रता सिद्ध असणे हा अतिशय गरजेचा भाग आहे. त्यामुळे नवीन विकास प्रकल्पांमध्ये झोपडीधारकाची फसवणूक होणार नाही. बायोमेट्रिक सर्व्हेक्षणामुळे झोपडीधारकांच्या माहितीमध्ये अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल.
– बी.आय. केंद्रे, मुख्य समन्वय अधिकारी, बायोमेट्रिक सर्व्हेक्षण कक्ष, एसआरए.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -