विरोधकांच्या बहिष्कारापेक्षा गाजली मुख्यमंत्र्यांची चहापानासाठीची गैरहजेरी

MVA tea session

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गैरहजेरीची चर्चा सत्ताधारी सरकारच्या चहापानात गाजली. आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे होती. त्यापाठोपाठच सत्ताधाऱ्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीचे चहापान पार पडले. त्यानंतर पत्रकार परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी ही प्रकर्षाने जाणवणारी दिसली. हिवाळी अधिवेशनापाठोपाठ मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा चहापानाच्या कार्यक्रमाला गैरहजर असल्याचे चित्र दिसले. तर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी एकदाही उपस्थिती अधिवेशनासाठी लावली नव्हती.

आज सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चहापानासाठी ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती होती खरी. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती मात्र या चहापानाच्या कार्यक्रमाला जाणवली. मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी असली तरीही इतर मंत्र्यांची मोठी गर्दी या चहापानासाठी पहायला मिळाली. मुख्यत्वेकरून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांची मुख्यत्वेकरून उपस्थिती होती. त्याशिवाय अशोक चव्हाण, मनिषा कायंदे, सुनिल प्रभू, कपिल पाटील यासारख्या नेत्यांची हजेरी या चहापानाच्या निमित्ताने दिसून आली.

विरोधकांचा बहिष्कार

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते असलेले नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहे. नवाब मलिक यांचे थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे सांगत नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी अख्खे सरकार उभे असल्याचा आरोप विरोधकांनी केला. नवाब मलिक राजीनामा देणार नसतील तर दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार असल्याचा आरोप राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.